गोव्यात आर्थिक आणीबाणीच : काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 08:28 PM2019-12-31T20:28:29+5:302019-12-31T20:28:33+5:30
राज्यावर 2012 सालापर्यंत फक्त सात हजार कोटींचे कर्ज होते.
पणजी : राज्यावर 2012 सालापर्यंत फक्त सात हजार कोटींचे कर्ज होते. आता एकूण 22 हजार कोटींचे कर्ज आहे. यापुढील तीन वर्षात ते पंचवीस हजार कोटींपर्यंत जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने गोव्यावर आर्थिक आणीबाणी लादली आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.
गोव्यात अत्यंत वाईट आर्थिक स्थिती निर्माण झाली असल्याचे आम्ही गेल्या ऑक्टोबर महिन्यात दाखवून दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री निलेश काब्राल यांना पुढे केले व काब्राल यांच्यामार्फत आमच्यावर टीका केली. आमचे दावे खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला पण गेल्या 24 डिसेंबर रोजी अर्थ खात्याने परिपत्रक जारी केले आणि सर्व खात्यांना वीस टक्क्यांनी खर्च कमी करण्याचा आदेश दिला आहे. यावरून राज्यातील आर्थिक आणीबाणीच स्पष्ट होत आहे, असे चोडणकर म्हणाले. वास्तविक पावसाच्या मोसमात रस्ते व अन्य विकास कामे करता येत नाहीत. त्यांचा वेग मंदावतो.
खर्चाची सगळी कामे ही डिसेंबरपासून सुरू होत असतात पण सरकारने खर्च करून नका असा आदेश आता जारी केला आहे. कारण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ही चिंताजनक स्थिती असल्याने मुख्यमंत्र्यांनी यावर स्वत: भाष्य करावे. त्यांनी श्वेतपत्रिका जारी करावी, असे चोडणकर म्हणाले. गोव्यावरील कर्जाचे प्रमाण 22 हजार कोटींवर पोहचल्याचे आरबीआयने दाखवून दिले आहे. सरकार प्रचंड कर्ज घेत असून प्रथमच महिन्याभरात 681 कोटींचे कर्ज सरकारने घेतले. यापुढे जानेवारी व फेब्रुवारीत मिळून सरकार आणखी सातशे कोटींचे कर्ज काढील. राज्य वित्त आयोगालाही सामोरे जाण्यास सरकार घाबरत आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली व सध्याच्या आर्थिक आणीबाणीला स्व. मनोहर र्पीकर व प्रमोद सावंत हे दोघेही जबाबदार असल्याचे ते म्हणाले.