मुख्यमंत्र्यांकडून गोव्याला मोठी अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 07:48 AM2024-03-19T07:48:07+5:302024-03-19T07:48:41+5:30

गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट उराशी बाळगलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची यशस्वी पाच वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त....

goa has great expectations from the chief minister | मुख्यमंत्र्यांकडून गोव्याला मोठी अपेक्षा

मुख्यमंत्र्यांकडून गोव्याला मोठी अपेक्षा

दत्ता खोलकर, म्हापसा

१७ मार्च २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने, ज्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविले, त्या डॉ. प्रमोद सावंत गेली पाच वर्षे राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम करताना गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट उराशी बाळगले आहे. त्यांनी समर्थपणे, पूर्ण जबाबदारीने राज्याची धुरा सांभाळली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करून जनतेचा यशस्वी कौल प्राप्त केला. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता प्रस्थापित केली. यावरून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर गोमंतकीयांनी शिक्कामोर्तब केल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

गोव्यासारख्या छोट्या राज्यात पाच वर्षे सलग मुख्यमंत्री म्हणून वावरणे म्हणजे अग्निदिव्य पार केल्यासारखे आहे. मुक्त गोव्याच्या ६३ वर्षांच्या राजकीय वाटचालीत राज्याला एकूण तेरा मुख्यमंत्री लाभले. सलग पाच वर्षे राज्याचे नेतृत्व करणारे डॉ. सावंत चौथे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी (स्व.) भाऊसाहेब बांदोडकर, (स्व.) शशिकलाताई काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांनी अशी कामगिरी केली होती. राणे यांनी तर १९८० ते १९९० अशी सलग दहा वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. सुमारे तीस वर्षांनी डॉ. प्रमोद सावंत यांनी ही किमया करून दाखविली आहे. ही कामगिरी करणारे भाजपचे, ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांचा राजकीय मुत्सद्दीपणा, मनमिळावू वृत्ती, नेतृत्व गुण, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव यामुळेच ते एक यशस्वी व कर्तबगार राजकीय नेते ठरले आहेत.

राज्यातील जनता १९९० च्या दशकातील अस्थिर सरकारांची मालिका व राजकीय अराजकता अजूनही विसरलेली नाही. दहा वर्षात तेरा सरकारे, आठ मुख्यमंत्री व दोन वेळा राष्ट्रपती राजवट. देशभर गोव्याची निंदानालस्ती होत होती. गोव्याला आयाराम गयारामांचे राज्य म्हणून हिणवले जात होते. अशा केविलवाण्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षामुळेच, राज्याला राजकीय स्थिरता प्राप्त झाली. 

२००० ते २०२४, अशा २४ वर्षांत राज्याला केवळ पाच मुख्यमंत्र्यांचे नेतृत्त्व लाभले. भाजपच्या आतापर्यंतच्या सतरा वर्षांच्या राजवटीत तीन मुख्यमंत्र्यांचे नेतृत्त्व लाभल्याने राज्याला पुन्हा राजकीय स्थिरता प्राप्त झाली. यामुळे जलद विकास, भरघोस केंद्रीय निधी व विविध कल्याणकारी योजना लाभल्या. आज डॉ. सावंत यांच्या कणखर व सर्जनशील नेतृत्त्वाखाली राज्य सर्वांगीण विकास साधण्यासाठी वेगाने मार्गक्रमण करत आहे. मुख्यमंत्री सावंत यांची सगळ्यात मोठी उपलब्धी हीच की त्यांनी राज्याला पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थिर सरकार दिले. डब्बल इंजिनच्या गतीने राज्याचा विकास सुरू आहे.

राज्य सरकारची धुरा सांभाळताना विधानसभेतील त्यांचे कर्तृत्व उत्कृष्ट राहिले आहे. सरकारवर हल्लाबोल झाला तरी न डगमगता, त्यांनी विरोधकांच्या तोफा परतवून लावल्या, टीका झाली तरी, त्यांनी विरोधकांना शांत करण्याचे कसब आत्मसात केले आहे. विरोधी आमदारांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. चांगले वक्तृत्व, पटवून देण्याची शैली यामुळे अधिवेशनावेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या व टीव्हीवर प्रक्षेपण बघणाऱ्या हजारो लोकांच्या पसंतीस उतरते आहेत. युवा वर्गात ते अफाट लोकप्रिय आहेत. सोशल मीडियाच्या बाबतीत ते राज्यात अव्वल असून या माध्यमातून त्यांचा कनेक्ट हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला 'एकात्म मानववाद' व 'अंत्योदय' आर्थिक कार्यक्रम अमलात आणण्यासाठी त्यांनी 'स्वयंपूर्ण गोवा' आणि 'सरकार तुमच्या दारी' यांसारखे अभिनव उपक्रम राबवून लोकांप्रती तळमळ व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील कित्येक प्रतिष्ठीत प्रकल्प पूर्णत्वास नेले असून राज्याचा विकास प्रचंड वाढला आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त जुवारी पूल व सहा पदरी महामार्ग, आयुष इस्पितळ, शैक्षणिक वास्तु, प्रशासकीय इमारती व इतर महत्त्वाच्या साधन सुविधा प्रकल्पांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या सत्ताधारी गटात सध्या २८ आमदार असून भक्कम बहुमत प्राप्त झाले आहे. गेल्या टर्म मध्येसुद्धा ७ आमदारांचे पाठबळ होते. राज्याच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाला एवढे बहुमत मिळाले आहे. याला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा संयमी स्वभाव व सर्वसमावेशक आचरण, दृष्टीकोन कारणीभूत आहे. बहुतांश आमदार त्यांच्या नेतृत्त्व गुणांची प्रशंसा करतात. विरोधी पक्षातील आमदार त्यांचे नेतृत्व मान्य करूनच सत्ताधारी गटात सामील होतात, ही वस्तुस्थिती आहे. सध्याच्या सत्ताधारी विधिमंडळ गटात रवि नाईक, सुभाष शिरोडकर, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा किंवा ढवळीकरांसारखे बरेच ज्येष्ठ व दिग्गज सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांचे त्यांच्याशीही सौहार्दाचे संबंध आहेत. पक्ष कार्यकर्त्यांबरोबरही त्यांचा उत्तम कनेक्ट असून, पार्टी केडरमध्ये याबाबत समाधान व्यक्त केले जाते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले असून, राज्याबाहेरसुद्धा त्यांचे नेतृत्व विकसित होताना दिसते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची सगळ्यांशी सलोख्याने वागण्याची कार्यपद्धती उपयुक्त ठरली आहे.

सरकारी सेवेत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून रुजू झालेला एक युवक राजकारणात प्रवेश करून राज्याचे यशस्वी नेतृत्व करेल, ही अशक्य वाटणारी कल्पना सत्यात उतरल्याचे आपण पाहतो. २००८ मध्ये पाळी मतदारसंघात तत्कालीन आमदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली. गोव्यात काँग्रेसची सत्ता होती. स्व. मनोहर पर्रीकर यांना पक्षातील कार्यकर्त्यांची व युवा नेत्यांची अचूक पारख होती. ते त्यांच्यातील चुणूक व नेतृत्त्व क्षमता ओळखून त्यांना पूर्ण ताकदीने पुढे आणायचे. कित्येक नवीन आमदारांना त्यांनी घडवले. पर्रीकर यांनी पोटनिवडणूक घोषित होताच डॉ. सावंत यांना सरकारी नोकरी सोडण्यासाठी प्रवृत्त करून भाजपची उमेदवारी बहाल केली. खरे तर भाजपा विरोधी पक्ष असल्यामुळे निवडणूक जिंकण्याची शाश्वती नव्हती. 

डॉ. सावंत यांच्यासाठी पर्रीकर राजकीय गुरू होते. त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी सोडले. पक्ष निष्ठेचे हे उत्तम उदाहरण होते. ही पोटनिवडणूक ते हरले, मात्र जरासुद्धा डगमगले नाहीत. त्यांनी स्वतःला पक्ष संघटन कार्यात गुंतवून ठेवले. पुढे सलग तीन वेळा याच मतदारसंघातून निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक साधली. मंत्रिपदाचा अनुभव नसतानाही २०१९ मध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदी निवडण्यात आले. २००८ मध्ये त्यांनी दाखवलेल्या पक्षनिष्ठेची ही योग्य पावती त्यांना मिळाली होती. आज एक सरकारी डॉक्टर यशस्वी मुख्यमंत्री म्हणून वावरताना सार्थ अभिमान वाटतो. डॉ. प्रमोद सावंत यांचा हा राजकीय प्रवास आणखी दिमाखदार व्हावा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गोवा देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून नावारूपास यावे, ही अपेक्षा.

 

Web Title: goa has great expectations from the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.