जेएन-१ चे देशात सर्वाधिक ४७ बाधित गोव्यात
By वासुदेव.पागी | Published: December 30, 2023 06:04 PM2023-12-30T18:04:09+5:302023-12-30T18:05:14+5:30
नवीन अहवालानुसार या व्हेरीयन्टचे आणखी २८ बाधित गोव्यात आढळले आहेत.
पणजी: कोविडचा नवीन व्हेरीयंन्ट असलेला जेएन-१ या व्हेरीयन्टचे गोव्यात ४७ बाधित आढळले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हा व्हेरीयन्ट आढळणारे गोवा पहिले राज्य ठरले आहे.
कोविडची प्रकरणे गोव्यात वाढत असतानाच जेएन-१ व्हेरीयन्टही आता मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. या पूर्वी या व्हेरियन्टचे १९ बाधित आढळले होते. परंतु जिनोमीक सिक्वेन्सींग विभागाच्या नवीन अहवालानुसार या व्हेरीयन्टचे आणखी २८ जण गोव्यात आढळले आहेत. त्यामुळे या व्हेरीयन्टचे एकूण ४७ बाधित झाले आहेत. ही संख्या देशात सर्वाधिक आहे.
जेएन-१ ही कोव्हिडची नवीन प्रजाती सुरूवातीला चीनमध्येच आणि नंतर युरोपी देशात आढळली होती. केरळ आणि इतर राज्यात त्याचा शिरकाव झाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी गोव्यातही हा व्हेरीयन्ट दाखल झाल्याचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवालाद्वारे स्पष्ट झाले होते. म्हापसा उत्तर जिल्हा इस्पितळात जिनोम सिक्वेन्सिंग विभाग आहे. त्याठिकाणी कोविडच्या नमुन्याचे सिक्वेन्सिंग केले जाते. सिक्वेन्सिंगसाठी निवडले गेलेले नमुने हे सँपल तत्वावर निवडले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष जएन-१ बाधितांची संख्या ही ४७ पेक्षा अधिकही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.