गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी मनोहर पर्रीकर यांची हॉस्पिटलमध्ये घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 12:22 PM2018-02-28T12:22:17+5:302018-02-28T12:22:17+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बुधवारी (28 फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरूच आहेत.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बुधवारी (28 फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरूच आहेत. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्या प्रकृतीची विचारपू केली. राणे यांनी गोमेकॉतील डॉक्टरांशीही चर्चा केली. मुख्यमंत्री पर्रीकर गेल्या चौदा दिवसांपासून आजारी आहेत. मुंबईतील लिलावती इस्पितळात ते सात दिवस होते. 15 फेब्रुवारीला लिलावती इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर स्वादूपिंडाशीसंबंधित आजारावर उपचार करण्यात आले. गेल्या 22 फेब्रुवारी ला मुख्यमंत्री मुंबईहून गोव्यात दाखल झाले.
त्यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडत फक्त सहा मिनिटांचे भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईहून खासगी विमान पकडून गोव्यात येण्याची घाई उगाच केली अशी प्रतिक्रिया त्यावेळी काही मंत्री व आमदारांमध्ये व्यक्त झाली. मुख्यमंत्र्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली राहणे व उपचारांची गरज आहे, अशी चर्चा राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात सुरू होतीच. गेल्या रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री अचानक पुन्हा गोमेकॉ इस्पितळात दाखल झाले व ही चर्चा खरी ठरली. आज बुधवारी मुख्यमंत्र्यांना तिथे चार दिवस होत आहेत. पर्रीकर यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने व त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना गोमेकॉत आणण्यात आले होते.
आरोग्य मंत्री राणे हे रोज सकाळी गोमेकॉ इस्पितळाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा करत आहेत. गोव्याचे माजी अॅडव्हकेट जनरल तथा देशाचे विद्यमान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही मुख्यमंत्र्यांची सलग दोन दिवस भेट घेतली व चर्चा केली. पर्रीकर यांनी आपण बुधवारी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेईन, असे गेल्या गुरुवारी सर्व मंत्र्यांना सांगितले होते पण मुख्यमंत्र्यांची प्रकृती पाहता बुधवारी मंत्रिमंडळ बैठक घेता येणार नाही याची कल्पना अन्य मंत्र्यांना आली होती. मुख्यमंत्री विश्रंती घेणो टाळतात अशी भावना काही मंत्र्यांची झाली आहे. भाजपाच्या कोअर टीमच्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांविषयी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री लिलावतीमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेऊन आरोग्याविषयी चर्चा केली होती. प्रसंगी मुख्यमंत्र्यांना विदेशात नेऊन देखील उपचार करावेत असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आल्याची चर्चा भाजपच्या आतिल गोटात व मंत्र्यांमध्येही सुरू आहे. मात्र यास अधिकृतरित्या दुजोरा मिळाला नाही. पर्रीकर आजारातून गोव्यात किंवा भारतातच बरे होतील, असा विश्वास अनेकांना वाटतो.