महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होईल, गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 06:55 PM2019-12-02T18:55:11+5:302019-12-02T18:55:37+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात शिरकाव करण्याची स्वप्ने पाहू नयेत.
पणजी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात शिरकाव करण्याची स्वप्ने पाहू नयेत. गोव्यात शिवसेनेला स्थानच नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी येथे नमूद केले व येत्या सहा महिन्यांत कदाचित महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होईल, असाही दावा त्यांनी केला. गोव्यातील विरोधी बाकांवरील अवघ्याच आमदारांनी शिवसेनेच्या नादाला लागणे हा मूर्खपणा आहे, असे राणे म्हणाले.
येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणे म्हणाले की, गोव्यातील सगळे मंत्री हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वासोबत आहेत. गोव्यात सत्ता बदलाचा प्रश्नच येत नाही, कारण भाजपा सरकारकडे येथे 30 आमदारांचे संख्याबळ आहे. विरोधात फक्त दहा आमदार आहेत. त्यापैकीही एखाद्याला जर मंत्रिपदाची ऑफर दिली गेली, तर सगळेच आमच्या बाजूने धावत येतील. शिवसेनेला गोव्यात यापूर्वीही कधीच स्थान मिळाले नाही व यापुढेही मिळणार नाही.
मंत्री राणे म्हणाले, की गोव्यात राजकीय भूकंप होईल किंवा गोवा सरकार पडेल, अशी हास्यास्पद विधाने संजय राऊत करत आहेत. राऊत यांना अशी विधाने करून महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळते, पण गोव्यात त्यांचे हसे होते. शिवसेनेला महाराष्ट्रात लॉटरी लागली पण येत्या सहा महिन्यांत कदाचित महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होईल. गोव्यातील जे अवघेच विरोधी आमदार शिवसेनेला सोबत घेऊन विरोधी आघाडी स्थापन करू पाहत आहेत, त्यांनी जरा दक्षिण गोव्याचाही विचार करावा. शिवसेना म्हटले की, ख्रिस्ती मतदार घाबरतात. शिवसेनेला मिठी मारण्याच्या प्रयत्नांचा उत्तर व दक्षिण गोव्यावर काय परिणाम होईल याचा विचार विजय सरदेसाई यांनीही करावा.
मंत्री राणे म्हणाले, की गोवा भाजपाचे कुठचेच आमदार शिवसेनेसोबत जाऊ शकत नाहीत, कारण त्यांना राजकीय आत्महत्या करायची नाही. सरकार स्थिर आहे. शिवसेनेसारख्यांच्या नादाला लागणे हा मूर्खपणा आहे. हाती तलवार घेणा-या शिवसेनेला जर तलवारी कमी पडत असतील तर आम्हीच त्या उपलब्ध करून देऊ, पण त्यांनी त्या तलवारी महाराष्ट्रापुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. पोर्तुगीजांविरुद्ध लढताना गोमंतकीयांनी खूप तलवारी मिळविल्या आहेत. आमच्या जुन्या घरीही तलवारी आहेत. विरोधातील दहापैकी नऊ आमदारांना आपण त्या तलवारी देऊ शकतो.