गोवा विद्यापीठाला हायकोर्टाचा धक्का; प्रवेश परीक्षा रद्द ठरविण्याचा आदेश तूर्त स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:55 PM2023-07-27T12:55:03+5:302023-07-27T12:57:24+5:30
या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बी.ए., एलएलबी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा रद्द करण्याच्या कृतीला साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. खंडपीठाने हे प्रकरण दाखल करून घेऊन सोमवारपर्यंत जैसे थे परिस्थिती राखण्याचा आदेश दिला. त्यामुळे खंडपीठाचा परीक्षा रद्द करण्याचा आदेश सोमवारपर्यंत (दि. ३१ जुलै) स्थगित झाला आहे.
या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत विद्यापीठाला या प्रकरणात तोडगा काढावा लागणार आहे. तसेच ८ जून रोजी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मोकळीकही देण्यात आली आहे.
एलएलबी अभ्यासक्रमासाठीच्या जीक्लेट प्रवेश परीक्षेत घोळ झाल्याची तक्रार कारे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी गोवाविद्यापीठाकडे केली होती. विद्यापीठाकडून या प्रकरणात चौकशी करण्यासाठी प्रो. सविता केरकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. या समितीने या प्रकरणाची चौकशी करून दिलेल्या अहवालात महाविद्यालयाचे प्राचार्य साबा दा सिल्वा यांच्याकडून घोळ करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला शिफारस करण्यात आली होती.
त्यानंतर विद्यापीठाने प्रवेश परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा करून ६ ऑगस्ट ही तारीखही जाहीर केली. तसेच निकालाची तारीख ही ८ ऑगस्ट असल्याचेही जाहीर केले आहे. गोवा विद्यापीठाच्या निर्णयाला महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले. एका प्राचार्याची शिक्षा १८० विद्यार्थ्यांना का देता? असा त्यांचा प्रश्न आहे.