गोवा : म्हादईचे पाणी कर्नाटकला वापरु दिल्यास हरकत नाही, मात्र पाणी मलप्रभेत वळविण्यास विरोध - भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 06:59 PM2018-01-04T18:59:54+5:302018-01-04T19:00:36+5:30
म्हादईचे पाणी कर्नाटकला वापरु दिल्यास हरकत नाही, परंतु पाणी मलप्रभेत वळविण्यास मात्र विरोध असल्याचे प्रदेश भाजपने स्पष्ट केले. दुसरीकडे कोळसा हाताळणीच्या बाबतीत अदानींना काँग्रेसच्या काळातच परवाने दिल्याचा दावा पक्षाने केला आहे.
पणजी : म्हादईचे पाणी कर्नाटकला वापरु दिल्यास हरकत नाही, परंतु पाणी मलप्रभेत वळविण्यास मात्र विरोध असल्याचे प्रदेश भाजपने स्पष्ट केले. दुसरीकडे कोळसा हाताळणीच्या बाबतीत अदानींना काँग्रेसच्या काळातच परवाने दिल्याचा दावा पक्षाने केला आहे.
प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक, प्रेमानंद म्हांबरे, माजी आमदार सुभाष फळदेसाई, किरण कांदोळकर यानी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दत्तप्रसाद म्हणाले की, कर्नाटकच्या हद्दीत म्हादईचे ३५ किलोमिटर खोरे आहे. तेथे ते पाणी वापरत असतील तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही. परंतु म्हादईचे पाणी जर मलप्रभेत वळविण्यात येत असेल तर त्याला विरोध राहील.
अदानी यांच्याशी भाजपचा संबंध असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा आरोप फेटाळून लावताना उलट अदानींना काँग्रेसच्या काळातच कोळसा हाताळणीसाठी परवाने देण्यात आल्याचा आरोप दत्तप्रसाद यांनी केला. केंद्रात संपुआचे सरकार आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते तेव्हाच हे परवाने देण्यात आल्याचा दावा करताना त्यांनी तारखाही सादर केल्या. रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन-२८ एप्रिल २00८, बोली स्वीकारली-३0 जून २00९, कन्सेशनरची निवड-४ आॅगस्ट २00९, आॅफरपत्र-७ आॅगस्ट २00९, कन्सेशनवर सह्या-२२ सप्टेंबर २00९ व विस्तारकामाची सुरवात-१५ मे २0१0 अशा तारखा सादर करुन काँग्रेसनेच अदानींना परवाने दिल्याचा दावा त्यांनी केला. २0१३ साली काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी अदानी कंपनीला नियम बाजुला ठेवून पर्यावरणीय परवानाही दिल्याचे दत्तप्रसाद यांनी नमूद केले.
नवीन जिंदाल यांच्या साउथ वेस्ट पोर्ट लि, कंपनीलाही काँग्रेसच्या काळात नरसिंह राव पंतप्रधान असताना परवाने दिल्याचा आरोप करण्यात आला.
राज्याचा आर्थिक डोलारा ढासळला असल्याचा आरोपही फेटाळून लावण्यात आला. २0१६-१७ ची आर्थिक तूट ९३४ कोटी ६३ लाख रुपये होती. शांताराम यांनी दिलेला आकडा चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला. कसिनोंकडून महसूल मिळत नाही हा आमदार रेजिनाल्द यांनी केलेला दावाही फेटाळून लावण्यात आला.
राज्य सहकारी बँकेच्या २00७ पासूनच्या कारभाराची चौकशी करा : सुभाष फळदेसाई
राज्य सहकारी बँकेबाबत रेजिनाल्द यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना माजी आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले की, बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. बँकेवर प्रशासक नेमलेला असून बँक नफ्यात आहे. बँकेत २00७ ते २0११ या कालावधीतच घोटाळे झालेले आहेत, असा दावा करुन सत्य बाहेर यावे आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी हवे असेल तर २00७ पासून आजपर्यंतच्या कारभाराची सर्व चौकशी करावी, असे आव्हान फळदेसाई यांनी दिले.