Goa: गोव्यात अनुकंपा नोकरीसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये, गोवा सरकारचा निर्णय
By किशोर कुबल | Published: July 12, 2023 01:58 PM2023-07-12T13:58:22+5:302023-07-12T13:58:40+5:30
Goa Government: गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे.
- किशोर कुबल
पणजी : गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ३ लाख रुपये उत्पन्न मर्यादेमुळे अनेकांना अर्ज करता आले नाहीत. त्यांना आता अर्ज सादर करता येतील. सरकारी नोकरीत असताना मृत्यू पावल्यास संबंधित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला सरकारी खात्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. वरील निर्णयाचा सुमारे ३५० जणांना लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एका प्रश्नावर म्हणाले कि,‘ सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेणाय्रांना त्यांचे बॅंक खाते आधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे आहे. गृह आधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा तसेच अन्य कल्याणकारी योजनांसाठीही हे लागू आहे. त्यामुळे लाभार्थींनी आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक करावे.’ दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत विद्यालयांसाठीच्या विद्या साहाय्य योजनेला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती मदत सेवा विभागाला २५ हजार चौरस मिटर जमीन प्रदान करणे, दक्षिण गोव्यात चार ठिकाणी बॅायलर ॲापरेटरचे पद भरणे, जागतिक टेनिस स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप आदी गोष्टींना मंजुरी देण्यात आली. पत्रकार परिषदेस वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो हेही उपस्थित होते.