गोवा, भारत आणि नेहरू; राजेंद्र आर्लेकरांचे विधान अन् तर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 07:44 AM2024-08-23T07:44:14+5:302024-08-23T07:44:39+5:30

नेहरूंच्या विधानामागे कोणती पार्श्वभूमी होती हे नेमकेपणाने आज कुणी सांगू शकत नाहीत. त्याबाबत दोन दावे केले जातात. 

goa india and pt jawaharlal nehru statement of rajendra arlekar | गोवा, भारत आणि नेहरू; राजेंद्र आर्लेकरांचे विधान अन् तर्क

गोवा, भारत आणि नेहरू; राजेंद्र आर्लेकरांचे विधान अन् तर्क

१९६१ साली गोवा मुक्त झाला त्यावेळी स्थिती वेगळी होती, सामाजिक- धार्मिक-आर्थिक स्तरावर वेगळे वातावरण होते. हिंदू बहुजन समाज भेदरलेला होता, कारण पोर्तुगीज काळात समाजाचे जे काही घटक सत्तेशी चांगले संबंध ठेवून राहिले होते, त्यांच्याकडेच जमिनी शाबूत राहिल्या आणि त्यांचीच आर्थिक व सामाजिक उन्नतीही झाली होती. ज्यांनी पोर्तुगीजांशी दोन हात केले, संघर्ष केला, त्यापैकी अनेकजण देशोधडीला लागले. खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची अनेक कुटुंबे बिचारी हलाखीचे जीवन जगत राहिली. पोर्तुगीज राजवटीत आपल्यावर एका ठरावीक घटकाने अन्याय केला, पण मुक्तीनंतर आता तरी आपल्याला चांगले दिवस यायला हवेत असे स्वातंत्र्यसैनिकांना आणि बहुजनांमधील अनेक उपेक्षित घटकांना वाटले. 

यापैकी बहुतेकांनी गोवा महाराष्ट्रात विलीन करूया असा आग्रह धरला होता, अर्थात त्याकाळी गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही हे मोठे उपकार झाले. गोवा वेगळे राज्यच राहायला हवे हा मुद्दा नंतरच्या काळात व आतापर्यंत तर सर्वांनाच पटला. आता बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय सुपुत्र राजेंद्र आर्लेकर यांनी परवा नेहरूंविषयी जे विधान केले, त्याकडे पहावे लागेल. गोव्याचे लोक अजीब आहेत, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, नेहरूंच्या विधानामागे कोणती पार्श्वभूमी होती हे नेमकेपणाने आज कुणी सांगू शकत नाहीत. त्याबाबत दोन दावे केले जातात. 

ज्येष्ठ लेखक स्वर्गीय चंद्रकांत केणी यांच्याशी बोलताना नेहरू तसे बोलले होते असा दावा केला जातो, राज्यपाल आर्लेकर यांनी पणजीत परवा एक राखी सैनिकांसाठी कार्यक्रमात बोलताना नेहरूंचा वरवर असा संदर्भ दिला. आर्लेकर यांना स्वतःला अजीब शब्दाचा अर्थ जसा अभिप्रेत आहे, त्या पद्धतीने ते बोलले. नेहरूंनी गोमंतकीयांना अजीब म्हटले होते, पण आर्लेकर म्हणतात त्यासाठी नव्हे असे काहीजण आता सांगतात. पण आर्लेकरांचा मुद्दा असा की गोवा हे भारतापासून वेगळे राज्य नव्हे तर गोवा प्रदेश हा पूर्णपणे भारतीयच आहे. गोव्याला किंवा गोंयकारांना त्याबाबत अजीब म्हणता येणार नाही, असा दावा आर्लेकर यांनी केला, गोवा के लोग अजीब है, असे नेहरूंनी म्हटले होते पण ते गोवा भारतापासून वेगळाच आहे अशा अर्थाने म्हटले नव्हते, हा अभ्यासकांचा दावा आहे. 

अर्थात हा दावा पटतोच, मग कोणत्या अर्थाने नेहरू तसे बोलले होते हा प्रश्न येतो. त्यासाठी पुन्हा दोन वेगवेगळी उत्तरे दिली जातात. ज्या काळी भाषेच्या आधारावर विविध राज्यांची निर्मिती होत होती, तेव्हा काहीजण गोवा पूर्ण स्वतंत्र राज्य राहू दे म्हणत होते तर अनेक हिंदू गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ दे अशी मागणी करत होते. गोवा कर्नाटकात विलीन करा असे कुणी मागितले नव्हते. महाराष्ट्रात विलीन करा, असे म्हटले होते; कारण सांस्कृतिकदृष्ट्या व भाषिकदृष्ट्या आपल्याला ते जवळचे राज्य ही भावना होती व आहे. देवनागरी लिपीही गोंयकारांनी स्वीकारली. हिंदूंनी स्वीकारली. बहुतांश ख्रिस्ती बांधवांनी स्वीकारली नाही. काहीजणांना गोवा स्वतंत्र झाला व पोर्तुगीज गोव्यातून गेले ही गोष्टदेखील एकेकाळी रुचली व पचली नव्हती. अर्थात याबाबत कुणा विशिष्ट घटकाला दोष देता येणार नाही, कारण आपल्या राज्यातील ऐतिहासिक अपघातच वेगळे आहेत. म्हणूनच तर गोमंतकीयांच्या राष्ट्रीयत्वाचा हास हे पुस्तक जन्मास आले. 

अनेकजण अजूनदेखील गोंयकारपण म्हणजे भारतापासूनही वेगळेच काही तरी रसायन आहे, असे मानतात; पण ते जाहीरपणे तसे सांगत नाहीत एवढेच. असो. दूसरी गोष्ट अशी की पूर्ण देशात काँग्रेस पक्ष जिंकला होता तेव्हा गोव्यात मात्र लोकांनी मगो पक्ष निवडून आणून काँग्रेसचा पराभव केला होता. त्या संदर्भातही गोवा के लोग अजीब है असे नेहरू बोलले होते, असा ठोस दावा काही अभ्यासक करतात. हा दूसरा दावा अधिक पटतो, पण कोणता दावा खरा? हा खरे म्हणजे चर्वेचा विषय व्हायला हवा. आर्लेकर यांनी गोवा भारतापासून वेगळा नव्हे, असा मुद्दा मांडताना नेहरूंच्या अजीब शब्दाचा संदर्भ द्यायला नको होता एवढे पटते. पण नेहरू नेमके तसे का बोलले होते हे सांगण्यासाठी आज नेहरूही हयात नाहीत.

Web Title: goa india and pt jawaharlal nehru statement of rajendra arlekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा