नवीन युगातील उद्योगांसाठी गोवा हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र - जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो
By समीर नाईक | Published: January 27, 2024 04:52 PM2024-01-27T16:52:18+5:302024-01-27T16:53:06+5:30
पणजी येथे २९ जानेवारी रोजी होणाऱ्या इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेचे अपेक्षित फलित यावर भाष्य करताना धेंपो यांनी राज्याच्या तरुणांना नवयुग क्षेत्रात लाभदायक रोजगारासाठी विशिष्ट कौशल्ये आत्मसात करण्याच्या परिवर्तनशील संधींवर प्रकाश टाकला.
पणजी: गोदाम, लॉजिस्टिक्स, माहिती तंत्रज्ञान (आयटी) अशा नव्या युगातील उद्योगांसाठी जागतिक गुंतवणूकीचे केंद्र म्हणून गोवा राज्य उदयास येत आहे. यातून भविष्यात राज्यात आर्थिक उलाढाल देखील होणार आहे, असे प्रतिपादन गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय)चे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी केले.
पणजी येथे २९ जानेवारी रोजी होणाऱ्या इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेचे अपेक्षित फलित यावर भाष्य करताना धेंपो यांनी राज्याच्या तरुणांना नवयुग क्षेत्रात लाभदायक रोजगारासाठी विशिष्ट कौशल्ये आत्मसात करण्याच्या परिवर्तनशील संधींवर प्रकाश टाकला.
गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी) आणि या परिषदेचे राष्ट्रीय भागीदार भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्या सहयोगाने इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
अवजड उद्योग क्षेत्रापुढे पर्यावरणीय संवर्धनाविषयक अनेक आव्हाने असल्याचे मान्य करत धेंपो यांनी गोवा-आयडीसीच्या माध्यमातून गोदाम, लॉजिस्टिक, आयटी, आयटीईएस, वैद्यकीय उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या नवीन युगातील उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करणे या मुद्द्यावर भर दिला.
इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद उपक्रमाचे स्वागत करताना धेंपो यांनी राज्यातील उद्योजक, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणत, व्यावसायिक संबंध वाढवणे, नव्या व्यवसाय संधींचा शोध घेणे व अशा संधींचा विस्तार करणे यासाठी ही परिषद चांगले व्यासपीठ ठरणार असल्याहबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.
इव्हेंस्ट गोवा २०२४ अंतर्गत गोव्यातील तरुणांना आर्थिक लाभ आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यापुढे युवकांनी केवळ पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता नव्या उद्योग क्षेत्रांतील संधींचा शोध घेण्यावर भर द्यावा, असेही धेंपो यांनी यावेळी सांगितले