गोवा विदेशी पर्यटकांसाठी आजही आवडते ठिकाण पण पर्यटन व्यवसाय महागला- मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 04:39 PM2024-02-07T16:39:12+5:302024-02-07T16:40:23+5:30
आमदार माविन गुदिन्हो यांच्या काही दिवसापूर्वीच्या दाव्याचेच केले समर्थन
म्हापसा : काशिराम म्हांबरे: गोवा हे देश विदेशी पर्यटकांसाठी अत्यंत आवडते स्थळ आहे पण विमानाचा प्रवास महागला आहे. हॉटेल्स तसेच इतर तत्सम व्यवसायाचेदर महागल्याने गोव्यात येणाºया पर्यटकांवर त्याचे परिणाम होऊन पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. महागलेले हे दर कमी करण्यासाठी उपाय योजना हाती घेऊन त्यावर नियंत्रण ठेवल्यास दर्जेदार पर्यटक गोव्यात येतील असा दावा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. आमदार माविन गुदिन्हो यांनी काही दिवसापूर्वी पर्यटन व्यवसाय महागल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे प्रतिपादन केले होते. त्याचे समर्थन आमदार लोबो यांनीही आता केले आहे.
डिसेंबरपर्यंत देशी पर्यटक गोव्यात होते पण ते दर्जेदार पर्यटक नव्हते. दर्जेदार पर्यटक झाडाखाली बसून जेवत नाहीत. वडापाव खात नाहीत. गोव्यात सर्वत्र हे चित्र दिसते यातून पर्यटनाचा दर्जा खालावतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा पर्यटकांना उत्तेजन देता कामा नये. त्यावर नियंत्रणासाठी पंचायतीची दखल घेणे गरजेचे असून झाडाखाली बसून जेवण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पंचायतीने विशेष उपाय योजना हाती घेणे गरजेचे असल्याचे लोबो म्हणाले.
विमानाची भाव वाढ कमी व्हावी यासाठी सतत केंद्र सरकारकडेपत्रव्यवहार करुन ते कमी करण्याची विनंती करावी. गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन आहे. हा दर्जा राखून ठेवणे गरजेचे आहे. येथील व्यवसायाला जागतीक स्तरावरील इतर पर्यटन स्थळाकडे स्पर्धा करावी लागते. महसूल प्राप्तीसाठी गोवा फक्त पर्यटन व्यवसायावर अवलंबून तो टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे लोबो म्हणाले.
सध्या हॉटेल्स तसेच इतर तत्सम व्यवसाय महागले आहे. हा दर्जा राखून ठेवण्यासाठी हॉटेल्स तसेच इतर तत्सम व्यवसायिकांनी हॉटेलाचे भाव जागतिक स्तरावरील इतर हॉटेल्ससोबत तुलना करून त्यादृष्टीने लागू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास चांगले दर्जेदार पर्यटक गोव्यात येतील असाही दावा लोबो यांनी बोलताना केला.