अमित शहा व नड्डांसोबत गोवाप्रश्नी बैठक; राजकीय संघर्ष, विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 09:35 AM2024-09-30T09:35:32+5:302024-09-30T09:42:16+5:30
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे दोन्ही नेते या बैठकीस अपेक्षित आहेत, अशी माहिती आज दिल्लीहून राजकीय सूत्रांकडून मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील विविध राजकीय विषय आणि संघर्ष तसेच वादाचे मुद्दे याबाबत आज, दि. ३० रोजी दिल्लीत अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ही बैठक घेतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे दोन्ही नेते या बैठकीस अपेक्षित आहेत, अशी माहिती आज दिल्लीहून राजकीय सूत्रांकडून मिळाली.
नड्डा यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक आज रात्री साडेआठ वाजता होईल. बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोषदेखील उपस्थित राहतील, नड्डा यांच्या कार्यालयातून याबाबतची कल्पना मंत्री विश्वजित राणे यांना देण्यात आली. त्यानंतर राणे हे काल रविवारी रात्रीच दिल्लीत दाखल झाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कदाचित आज दिल्लीस निघतील. गोव्यात नोकर भरतीबाबत असलेले विषय, भुतानी प्रकल्पांसह अन्य विषयांवरील आंदोलने, मंत्रिमंडळातील संघर्ष, सुरू असलेली टीका, व्हिडिओबाजी आणि त्यावरून होणारे आरोप-प्रत्यारोप, भाजपची सदस्य नोंदणी मोहीम आणि राणे यांनी अलिकडे केलेले भाषण हे सगळे विषय बैठकीत चर्चेला येतील. त्यासाठीच बैठक असल्याचे सांगण्यात आले. मंत्रिमंडळ फेररचना करायची की नाही यावरही चर्चा होईल.