कला अकादमी संकटात; दोन वर्षांपूर्वी लागले ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 03:59 PM2023-07-18T15:59:10+5:302023-07-18T15:59:33+5:30

गोवा कला अकादमी ही देशभरातली प्रसिद्ध संस्था.

goa kala academy and current situation | कला अकादमी संकटात; दोन वर्षांपूर्वी लागले ग्रहण

कला अकादमी संकटात; दोन वर्षांपूर्वी लागले ग्रहण

googlenewsNext

गोवा कला अकादमी ही देशभरातली प्रसिद्ध संस्था. गोव्यातील कलाकार, लेखक-कवी यांच्यासाठी कला अकादमी म्हणजे मानाचा तुरा. अकादमीत स्वर्गीय पु. ल. देशपांडेंपासून अनेकांचे कार्यक्रम एकेकाळी झाले आहेत. प्रभाकर पणशीकरांची नाटके आणि दिलीप कुमारच्या हस्ते इफ्फीचे उद्घाटनदेखील याच वास्तूने पाहिले आहे. दोन वर्षांपूर्वी मात्र अकादमीला ग्रहण लागले. 

अकादमीच्या नूतनीकरणाचा विषय वादात सापडला. त्यावरून सरकारची कोंडी करण्याची संधी विरोधकांना यापूर्वीच्या अधिवेशनात मिळाली होती. विरोधकांनी त्या संधीचे सोनेच केले. तब्बल पन्नास कोटी रूपये कला अकादमीच्या दुरुस्ती व नूतनीकरणावर सरकार खर्च करते, हा मुद्दाच गोमंतकीयांना सुरुवातीपासून पटला नाही व पचला नाही. राज्यकर्त्यांवर लोकांचा विश्वास राहिलेला नसल्याने समाजातील सगळेच लोक आता प्रत्येक सरकारी खर्चाकडे संशयानेच पाहतात. गोव्यातील कलाकार बिचारे हबकले आहेत. 

अकादमीचे बंद दरवाजे कलाकारांना वेदना देतात. अकादमी लोकांसाठी कधी खुली होणार हाच प्रश्न गेली दोन वर्षे विचारत आहेत. कला व संस्कृती खात्याच्या मंत्र्यांनी पूर्वी विविध तारखा दिल्या होत्या, पण आता तेही बांधकाम खात्याकडे बोट दाखवतात. बांधकाम खाते मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे आहे, तर कला अकादमी मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळले. चाळीस वर्षांपूर्वी त्या छपराचे बांधकाम झाले होते. आता नूतनीकरणावेळी छपराची डागडुजी कदाचित केली गेली नसावी. मात्र ते कोसळले कसे, याचे उत्तर बांधकाम खात्याला द्यावे लागेल. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी छप्पर कोसळले असते तर गोवा सरकारची समाजात आणखी नाचक्की झाली असती. कालच राज्यभरातून तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया आल्या. 

पन्नास कोटी रूपये खर्च करूनदेखील कला अकादमीची वास्तू नीट उभी राहत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी आमदार करू लागले आहेत. कुणी न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी करतो, तर विजय सरदेसाई यांच्यासारखा नेता सरकारवर चाळीस टक्के कमिशनचा आरोप करतो. कला अकादमीची दुर्दशा पणजीच्या स्मार्ट सिटीसारखी होऊ नये, ही लोकांची अपेक्षा, पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली पाचशे कोटींचा खर्च आतापर्यंत झाला असे सांगितले जाते. मात्र, पणजी तुटकी फुटकीच आहे. स्मार्ट झालीच नाही. शहरातील रस्ते पाहून लोक संबंधित यंत्रणेला शिव्याच देतात. 

कला अकादमीच्या विषयात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीरपणे लक्ष घालावे. सोशल मीडियावरून टीकेची झोड उठल्यानंतर काल मुख्यमंत्री सावंत यांनी अकादमीच्या कामाची पाहणी केली. छप्पर जिथे कोसळले आहे, तिथे जाऊन स्थिती जाणून घेतली. एरव्ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंते आपल्या केबिनमधून बाहेर येत नसतात. काल मात्र ते कला अकादमीपर्यंत आले. बांधकाममंत्री काब्राल यांनीही पाहणी केली. यापुढे अहवाल वगैरे येईल. मात्र, त्या अहवालालाही अर्थ नसेल. कला अकादमीच्या वास्तूचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून ही वास्तू नव्याने लोकांसाठी खुली करावी. पणजीतील रसिक थांबले आहेत. कलाकारांना पुन्हा कला अकादमीत आपल्या कलेचा आविष्कार करण्याची संधी लवकर मिळायला हवी. मराठी नाटके तियात्रे अशा उपक्रमांद्वारे ही वास्तू नव्याने गजबजायला हवी. बाजूने वाहणाऱ्या मांडवी नदीलादेखील पुन्हा कला अकादमी खऱ्या अर्थाने सजलेली नटलेली व सावरलेली हवी आहे.

खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळल्याने सरकारला पुन्हा कोट्यवधींचा खर्च करण्याची संधीच चालून आली आहे. असेदेखील म्हणता येते. आजपासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. कला अकादमीवरून सरकारने यापूर्वी शाहजहान ताजमहल असे टक्केटोमणे खूप ऐकले • आहेत. कदाचित आज पुन्हा अधिवेशनात विरोधक सरकारकडे पन्नास कोटी रुपयांचा हिशेब मागतील. चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनने पूर्वी अकादमीच्या कामाविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी सरकारने ही वास्तू गळत असल्याने आपण ती नीट करतोय असे सांगितले होते. आता तर छप्परच कोसळू लागल्याने सरकारने या वास्तूची नीट सर्जरी करावी. अन्यथा लोक गोव्यातील लोकप्रतिनिधींना आणखी दोष देतील.

Web Title: goa kala academy and current situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा