तीन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेले सर्वात मोठे पर्यटक जहाज गोव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:35 AM2017-11-19T00:35:17+5:302017-11-19T00:35:26+5:30
गोव्यात जहाजाद्वारे येणा-या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. वाढीचा वेग अजून मोठा नसला, तरी जहाजामधून गोव्यात एकदा तरी जायला हवे, असे पर्यटकांना वाटते. गोव्यातील मुरगाव बंदरात २०१९ मध्ये जगातील सर्वात मोठे ‘क्वीन मेरी २’ हे पर्यटक जहाज येणार आहे. त्यासाठी प्राथमिक तयारी बंदरात केली जात आहे.
- सद्गुरू पाटील ।
पणजी : गोव्यात जहाजाद्वारे येणा-या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. वाढीचा वेग अजून मोठा नसला, तरी जहाजामधून गोव्यात एकदा तरी जायला हवे, असे पर्यटकांना वाटते. गोव्यातील मुरगाव बंदरात २०१९ मध्ये जगातील सर्वात मोठे ‘क्वीन मेरी २’ हे पर्यटक जहाज येणार आहे. त्यासाठी प्राथमिक तयारी बंदरात केली जात आहे.
तीन हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेले हे जहाज गोव्यात येणार असल्याने, गोवा टूर अँड टुरिझम संघटनेच्या पदाधिकाºयांनीही नव्या व्यावसायिक संधीबाबत समाधान व्यक्त केले आहे. मात्र, अगोदर काही सुविधा वाढविणे, तसेच मुरगाव बंदर परिसरात सौंदर्यीकरण करणे गरजेचे असल्याचे गोवा टूर अँड टुरिझम संघटनेचे अध्यक्ष सावियो मासियास यांनी सांगितले.
सध्या रेल्वे, बस वाहतूक, खासगी वाहने, विमाने आणि जहाजे (जलमार्ग) या सर्व मार्गांद्वारे व साधनांद्वारे गोव्यात येऊन जाणाºया पर्यटकांची संख्या वार्षिक सरासरी साठ लाख आहे. केंद्रीय बंदरे व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी गोव्यातील क्रुझ टुरिझम म्हणजेच, मोठ्या जहाजांद्वारे होणारे पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने काही संकल्प सोडले आहेत.
गोव्यात वार्षिक ६० लाख पर्यटक येतात, त्यातील ५० ते ६० हजार पर्यटक जहाजांद्वारे येतात. सुमारे ३० लाख पर्यटक विमानाद्वारे येतात.
गोवा नावाचा ब्रँड आता जगाच्या पर्यटन नकाशावर तयार झाला आहे. या वर्षी गोव्यात एकूण ६४ हजार पर्यटक हे केवळ जहाजांमधून येणार आहेत, असे मुरगाव बंदराच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. ३० पर्यटक जहाजे गोव्याच्या मुरगाव बंदरात येतील. गोव्यात या आधी वर्षाला केवळ तीन-चार पर्यटक जहाजे येत होती. कोट्यवधींचा निधी खर्च करून मुरगाव पोर्ट ट्रस्ट नव्या सुविधा उभ्या करत असल्याने, क्रुझ पर्यटन पुढील पाच वर्षांत आणखी विकसित होणार आहे.
एम. व्ही. नॉटिका हे पर्यटक जहाज ५५३ विदेशी पर्यटकांना घेऊन नुकतेच गोव्यात आले. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलियामधील पर्यटक या भल्यामोठ्या जहाजामधून आले आहेत.
- मुंबई ते गोवा फेरीबोट सेवा महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे. त्यामुळे देशी पर्यटक मोठ्या संख्येने जहाजातून गोव्यात येऊ शकतील. विशेष म्हणजे, या जहाजावर रेस्टॉरंट आणि स्वीमिंग पुलाचीही सोय असेल.
मुरगाव बंदरात सुविधा विकसित करण्यात येत आहेत. नवे धक्के बांधले जात आहेत, त्यामुळे गोव्यात जगभरातून नजीकच्या काळात अधिकाधिक पर्यटक जहाजे येतील.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, बंदरे व जलवाहतूक
गोव्यात जहाजाद्वारे पर्यटन वाढणार आहे. या वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक जहाजाद्वारे येतील. देशाच्या विविध भागांना जोडणारी बोटसेवा गोव्याच्या मुरगाव बंदरातून सुरू करावी, असाही विचार आहे. त्यासाठी मुरगाव बंदरात नवे टर्मिनल बांधले जात आहे.
- आय. जेयाकुमार,
चेअरमन, मुरगाव पोर्ट ट्रस्ट