शेजारचे करतायेत महाराष्ट्रातील राजकीय नाट्ट्याची चर्चा, गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मोठा रस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 01:14 PM2019-11-12T13:14:07+5:302019-11-12T13:16:14+5:30
एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे
पणजी : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये प्रथमच गोव्यातील सर्वपक्षीयांमध्ये मोठा रस निर्माण झालेला आहे. सर्वच पक्षांचे नेते व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चवीने चर्चा करू लागले आहेत. गोव्यातही भाजपची सत्ता आहे व भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी गोव्यातही अलिकडे काही आमदार फुटल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे गोव्यातील प्रत्येकजण उत्सुकतेने पाहतो व गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोनातून त्या घडामोडींचा बहुतेकजण अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे. फक्त अमुक एका पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार अधिकारावर आले एवढे कळले की, पुरे अशी भावना गोमंतकीयांमध्ये असायची. मात्र गोव्यात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्च 2क्17 पासून आतार्पयत तेरा काँग्रेस आमदार फुटले. त्या शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोघे फुटले. एकूण पंधरा आमदार भाजपच्या प्रभावाखाली येऊन फुटल्याने गोव्यातील मगो पक्ष महाराष्ट्रातील शिवसेनेला सध्या आपल्या जागी पाहतो. आपण गोव्यात भाजपला धडा शिकवू शकलो नाही, शिवसेनेने तरी तो शिकवावा या अपेक्षेने गोव्यातील मगो पक्षाचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्रातील घडामोडींकडे पाहत असल्याचे दिसून येते.
गोवा फॉरवर्ड आणि मगो व एक-दोन अपक्ष भाजपप्रणीत आघाडी सरकारसोबत होते. मनोहर र्पीकर यांचे निधन झाल्यानंतर गोव्यातील राजकीय स्थिती बदलण्यास आरंभ झाला व भाजपने मगोप आणि गोवा फॉरवर्डसह अपक्ष रोहन खंवटे यांनाही दूर केले. त्यामुळे दुखावलेले हे तिन्ही घटक महाराष्ट्रात भाजप सत्तेपासून दूर राहतोय यात आनंद मानून घेत असल्याचे जाणवते. राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा संघर्ष महाराष्ट्रात सुरू आहे, गोव्यातील प्रादेशिक पक्ष या संघर्षातील प्रत्येक टप्प्याकडे बारीक लक्ष देऊन पाहत आहेत. मात्र गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीवर समाधानी आहे. भाजपने आपण सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका घेऊन चांगले केले, सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तर पुढील काळात भाजपलाच लाभ होईल अशी भावना गोव्यातील भाजपमध्ये आहे.
मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की भाजपने कायम प्रादेशिक पक्षांचा वापर केला. शिवसेनेला सरकारमध्ये राहून यापूर्वी भाजपकडून जी वागणूक मिळाली, तिच वागणूक मगो पक्षाला गोव्यात मिळाली. काँग्रेसचे प्रथम दोन आमदार भाजपने फोडले व त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपची ती नीती अत्यंत चुकीची होती. भाजप सरकार स्थापन करताना ज्या पक्षांचा आधार घेतो, त्या पक्षांना तो मित्रपक्ष म्हणतो पण मित्रपक्षांना दिलेला शब्द भाजप कधीच पाळत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात त्यांच्या वाटय़ाला नामुष्की आली आहे. भाजपचे स्वार्थाचे राजकारण हे छोट्य़ा पक्षांसाठी घातक आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे विविध अर्थानी पहावे लागेल.