गोवा : डिचोलीत बिबट्या जेरबंद, वन खात्याच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 05:23 PM2024-01-14T17:23:52+5:302024-01-14T17:24:05+5:30
सातत्याने आलेल्या तक्रारींनंतर वन विभागाने येथे पिंजरा (सापळा) लावला होता. त्यात रविवारी बिबट्या अडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोलीतील धबधबा परिसरात गेली अनेक दिवस दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याच्या अधिकाऱ्यांना रविवारी पहाटे यश आले. या भागात बिबट्याचा सतत वावर होता. त्याने काही कुत्र्यांचीही शिकार केली होती. सातत्याने आलेल्या तक्रारींनंतर वन विभागाने येथे पिंजरा (सापळा) लावला होता. त्यात रविवारी बिबट्या अडकला.
गावातील नागरिकांना बिबट्याची भीती सतावत होती. त्यामुळे वन खात्याला माहिती देण्यात आली. वन खात्याचे कर्मचारीही या ठिकाणी नजर ठेवून होते. त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. बिबटा सापळ्यात अडकल्याचे समजल्यावर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यातून सुरक्षित ठिकाणी नेले. बिबट्या सापळ्यात अडकल्यामुळे दिलासा मिळाल्याचे स्थानिकांनी सागितले. हा बिबट्या पकडण्यात यश आले असले तरी डिचोलीतील अनेक भागात बिबट्यांच्या वावर सुरू आढळून येतो. पाजवाडा येथे एक बिबट्या व लहान पिल्लू फिरत असल्याचेही स्थानिकांना आढळून आले आहे. तसेच व्हाळशी, मुळगाव, मये, नार्वे आदी भागात नेहमीच बिबट्या दर्शन घडत असते.
दरम्यान, केरी वन विभागाचे अधिकारी सॅबेस्तेव रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. त्याला आता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.