गोवा : पत्रादेवी नाक्यावर ट्रकसह ८० लाखांची दारू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 04:52 PM2024-04-10T16:52:56+5:302024-04-10T16:56:18+5:30
गोव्या सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.
पेडणे : आपल्या वाहनात इलेक्ट्रॉनिक कचरा असल्याचा दावा वाहन चालकाने केला. मात्र, अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता तब्बल ४२ लाख रुपयांची दारू तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. गोव्या सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.
गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या एका ट्रकची (एम. एच. ४७०१) तपासणी करण्यात आली. या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात चोरटी दारू जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला होता. पत्रादेवी अबकारी चेक नाक्यावर अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी एकूण ४२ लाख ६३ हजारांची दारू सापडली. या दारूसह ट्रक जप्त करण्यात आला आहे. सुमारे ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी विभागाच्या सूत्रांनी दिली. वाहन चालक आणि क्लिनर दोघांनाही अबकारी विभागाने ताब्यात घेतले.
ट्रकमधून किंगफिशर बियरसह विविध प्रकारची दारू जप्त केली आहे. एकूण ४२ लाख ६२ हजार किमतीची दारू जप्त करण्यात आली. वाहनाची किंमत सुमारे ३८ लाख रुपये आहे. पेडणे अबकारी विभागाने ट्रकसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला. अबकारी विभागाचे अधिकारी राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेव गावस, महेश गावकर, भारत पागी आदींनी या चेक नाक्यावर हे वाहन अडवले.
(छाया : निवृत्ती शिरोडकर )