जो जिता वोही सिकंदर, नव्हे सदानंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 10:50 AM2024-05-14T10:50:41+5:302024-05-14T10:51:36+5:30
गोव्यात भाजपा जिंकल्यावर त्याचे श्रेय उमेदवारांपेक्षा पक्षाध्यक्ष तानावडे, मुख्यमंत्री सावंत व शिस्तबद्धपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल.
अॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद
ज्या विषयाचे मला गम्य नाही त्याविषयी लिहायला किंवा बोलायला मी राजकारणी नाही; पण राजकारण हा माझा आवडीचा विषय असल्यामुळे मी कित्येक वर्षे वृत्तपत्रांच्या रविवार पुरवणीत राजकीय प्रहसने लिहायचो.
पूर्वी गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक व युनायटेड गोवन्स हे प्रादेशिक पक्ष होते. महाराष्ट्रवादी गोमंतक म्हणजे म.गो. हा पक्ष हिंदूंचा तर युनायटेड गोवन्स म्हणजे यु.गो. हा पक्ष खिश्चनांचा असा सर्वसाधारण समज होता; पण माझे काका श्रीरंग नार्वेकर युनाटेड गोवन्स पक्षात होते. म्हापसा पालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दोन वेळा यु.गो. पक्षातर्फे त्यांनी म्हापसा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती.
युगो. पक्षाशी असलेले आमचे लागेबांधे लक्षात घेऊन काही हिंदू राजकीय कार्यकर्ते 'नार्वेकर तुमच्या गळ्यातील दत्तगुरूंचे गंडेदोरे काढून त्या जागी बेतीन बांधा' असा उपदेश आम्हाला करून आमच्या वर टीका- टिपणी करायचे. त्या काळचे 'हिंदुत्व' आताएवढे 'जहाल' नसल्यामुळे ती टीका आमच्या जिव्हारी लागत नसे. निवडणुका संपल्यावर सर्व पक्षांतील लोक परत एकत्र येऊन त्यांचे 'गठबंधन' व्हायचे आणि हिंदू-ख्रिश्चन असा भेदभाव न करता 'गॉयकार' म्हणून गुण्या गोविंदाने
राहायचे.
'देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती...' ही रेकॉर्ड वाजवत निवडणुकांवेळी मोटार गाडीतून म.गो. पक्षाचा प्रचार व्हायचा; पण मगौने देव, देश व धर्माच्या नावाने कधी मते मागितल्याचे मला आठवत नाही. त्या काळी ख्रिश्चन मतदार बहुसंख्येने यु.गो. पक्षाचे समर्थन करायचे.
कदाचित त्यामुळेच बहुसंख्य हिंदू मतदारांचा पाठिंबा म.गो. पक्षाला मिळायचा. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काहीसे तसेच चित्र पाहायला मिळाले. बहुतेक खिश्चन मतदार, खास करून दक्षिण गोव्यात इंडिया आघाडीसोबत राहिले. काही मोजकेच बुद्धिजीवी किंवा 'बुधवंत' लोक वगळता बहुसंख्य हिंदू मतदारांनी भाजपाचे समर्थन केल्याचे दिसून आले. गोव्याचा राजकीय इतिहास व मतदारांची मानसिकता ध्यानात घेता ही शक्यता समोर येते.
अलीकडच्या काळात निवडणुकांना युद्धाचे स्वरूप आले आहे. युद्ध म्हटले की आपल्या सैनिकांचे, साधन सुविधांचे योग्य नियोजन, याबरोबरच विरोधकांच्या सामर्थ्यवान व कमकुवत जागा यांचा विचार व्हावा लागतो. निवडणुकांवेळी राजकीय पक्षाचा पक्षाध्यक्ष हा सेनापती असतो. भाजपाचे सदानंद शेट तानावडे यांनी आपली जबाबदारी यथायोग्यपणे निभावली. भाजपा व इंडिया आघाडीला उमेदवार निवडायला विलंब झाला तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून सदानंदनी सांगितले की 'उमेदवार कुणीही असू दे, पक्षाचे चिन्ह कमळ तुमच्या समोर आहे,'
उमेदवार निवडीपूर्वीच भाजपाने प्रचार कार्य सुरू केले. त्यानंतर दुसरे वक्तव्य सदानंद यांनी केले. ते म्हणाले, 'गोव्यात एकूण १७२५ बुथ आहेत. त्या सर्व बुथवर भाजपच्या समिती आहेत व त्यांच्या संपर्कात आपण आहोत. या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही निवडणूक लढवून जिंकणार आहोत.' त्यांचा निर्धार व पक्ष कार्यकर्त्यांविषयी त्यांनी दाखवलेल्या विश्वासाचे फळ निश्चितपणे त्यांना मिळेल. पक्षाध्यक्षांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी व आमदारांची साथ लाभली हेही या निवडणुकीत पाहायला मिळाले.
याव्यतिरिक्त भाजपाचे ज्येष्ठ नेते शिस्तबद्ध प्रचारात सहभागी झाले होते. भाजपाने दोन्ही मतदारसंघांतून संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांची नावे पाठवली होती, त्यात आमचे वकील मित्र नरेंद्र सावईकर यांचे नावही होते. दक्षिण गोव्याची उमेदवारी त्यांनाच मिळेल, अशी भाजपातील कित्येक जणांना आशा होती; पण उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांनी आपण दुखवल्याचे दाखवून न देता प्रचार कार्यात हिरीरीने भाग घेतला व पक्ष शिस्तीचे उदाहरण समोर ठेवले. उमेदवारी न मिळालेल्या इतर संभावितांनीही त्यांचेच अनुकरण केले. सांगे येथील 'सुभाष-सावित्री' यांच्यातील वाद निवडणुकीपूर्वी चव्हाट्यावर आला नाही.
काँग्रेसचे गोवा पक्षाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुठल्याही प्रकारे आक्रस्ताळेपणा न करता आक्रमणपणे प्रचार केला. एकेकाळी मगो पक्षाचे अस्तित्व तत्कालीन आमदार अॅड. बाबुसो गावकर यांना सोबत घेऊन ज्यांनी राखले, त्या उत्तर गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांतभाई खलप यांनी प्रचारादरम्यान आपल्या भाषणात प्रभावीपणे मुद्दे मांडले; पण त्यांचे विचार टीव्ही चॅनल पाहणाऱ्या व वृत्तपत्र वाचणाऱ्या ठरावीक मतदारांपुरतेच मर्यादित राहिले. घरोघरी जाऊन प्रचार कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव निश्चितपणे त्यांना जाणवली असेल. काँग्रेस पक्षाने दोन्ही मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली तेव्हा इतर इच्छुकांनी नाराजी व्यक्त करणारे जाहीर वक्तव्य करून प्रचारातून अंग काढले. नंतर काही जण प्रचारात सहभागी झाले; पण तोपर्यंत मतदारांपर्यंत एक नकारात्मक संदेश गेला होता. माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन 'घरी बसून प्रचार करीत आहेत' असा उपहासात्मक टोला पक्षाध्यक्षांनी मारला. त्यातच सगळे आले.
लोकसभेची ही निवडणूक गोव्यात जर काँग्रेसने जिंकली तर तो एक चमत्कार मानावा लागेल व त्याचे बहुतांश श्रेय सायलंट व्होटर, सामाजिक कार्यकर्ते किंवा ऑक्टव्हिस्टना द्यावे लागेल. जो जिता वो सिंकदर असे आपण म्हणतो; पण यावेळी गोव्यात भाजपा जिंकल्यावर त्या विजयाचे श्रेय उमेदवारांपेक्षा जास्त पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व शिस्तबद्धरीत्या पक्षासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच निर्विवादपणे द्यावे लागेल.