Goa Lok Sabha Election 2024: विधानसभेवेळच्या 'मगो'च्या ४४ हजार मतांविषयी उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:37 AM2024-03-27T07:37:30+5:302024-03-27T07:38:17+5:30

Goa Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या उमेदवार घोषणेनंतर ठरणार मतदारांची भूमिका

goa lok sabha election 2024 curious about the 44 thousand votes of mago party during the last vidhan sabha election goa | Goa Lok Sabha Election 2024: विधानसभेवेळच्या 'मगो'च्या ४४ हजार मतांविषयी उत्सुकता

Goa Lok Sabha Election 2024: विधानसभेवेळच्या 'मगो'च्या ४४ हजार मतांविषयी उत्सुकता

Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून काँग्रेस तसेच रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) हे प्रमुख पक्ष रिंगणात उतरणार आहे. मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे. 

काँग्रेस पक्षाने अद्याप भाजप विरोधात उमेदवार जाहीर केलेला नाही. आम आदमी पार्टी (आप) ने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भाजपचा सरकारमधील घटकपक्ष असलेल्या मगोची युती आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप, मगो या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. मगोने त्यावेळी तृणमूल काँग्रेससोबत युती केली होती. त्यामुळे मगोच्या पारड्यात उत्तर गोव्यातून ४४ हजार मते आली होती. आता लोकसभा निवडणुकीत भाजप-मगो युतीचा लाभ होणार की ही मते इतरत्र वळणार याविषयी उत्सुकता आहे.

२०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी मगोने उत्तर गोव्यातील ७ मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. या उमेदवारातील उत्तरेतून मांद्रे मतदारसंघातील उमेदवार जीत आरोलकर विजयी झाले. तर राजन कोरगावकर (पेडणे), नरेश सावळ (डिचोली) आणि दीपक ढवळीकर (प्रियोळ) हे आपापल्या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. इतर उमेदवार प्रवीण झांट्ये (मये), महादेव खांडेकर (साखळी) आणि विश्वेश प्रभू (वाळपई) यांना तुलनेत कमी मते मिळाली होती.

तृणमूलशी युतीचा फटका

विधानसभेवेळी मगोने तृणमूलसोबत केलेल्या युतीचा त्यांना बऱ्याच मतदारसंघ फटका बसला. मात्र नंतर मगोने तृणमूलसोबतची युती तोडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत सरकारमध्ये सहभाग घेतला. सध्या सुदीन ढवळीकर हे वीज मंत्री आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी, २०१९ मध्ये मगोने भाजपशी युती तोडली होती. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. मात्र ही युती तुटल्याचा परिणाम उत्तर गोव्यात भाजपवर झाला नसल्याचे दिसले. यंदा उलट चित्र आहे. मगोने भाजपला पाठिंब्याची घोषणा अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पूर्वीच केली आहे. त्यामुळे आता मगोचे मतदार काय करणार याची उत्सुकता आहे.

विधानसभेवेळी मगोला उत्तर गोव्यातून मिळालेल्या ४४ हजार मतांपैकी अनेक मतदार लोकसभेसाठी स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. पण बहुतांश मतदार भाजपसोबत जाऊ शकतात. काही मतदार काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यावर निर्णय घेऊ शकतात, असे दिसते. - देश किनळेकर, म्हापसा.

उत्तर गोव्यातील मगोचे उमेदवार भाजपसोबत राहतील की नाही हा प्रश्न आहे. ४४ हजारांपैकी बरेच मतदार हे फक्त मगोला मतदान करणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार निर्णय घेतील. काही मतदार भाजप हा जवळचा पक्ष मानतात. त्यामुळे त्यांचा कल त्यादिशने असेल. तर काही मतदार श्रीपाद नाईक यांच्या गेल्या २५ वर्षांतील कामाचा आढावा घेऊन मतदानाविषयी निर्णय घेतील असे दिसते. काही मतदार काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर झाल्यावर भूमिका ठरवतील. मात्र मगोचे सर्वच भाजपसोबत राहतील असे वाटत नाही. - अॅड. महेश राणे, म्हापसा.

 

Web Title: goa lok sabha election 2024 curious about the 44 thousand votes of mago party during the last vidhan sabha election goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.