पेडणेत जणू मिनी विधानसभा निवडणूकच; दोन विद्यमान आमदारांची लागणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 10:35 AM2024-04-15T10:35:30+5:302024-04-15T10:37:10+5:30

मताधिक्याचे आव्हान कोण पेलणार; काँग्रेस नेते, कार्यकर्तेही सक्रिय

goa lok sabha election 2024 it is like a mini assembly election in pedane two sitting mla will be tested | पेडणेत जणू मिनी विधानसभा निवडणूकच; दोन विद्यमान आमदारांची लागणार कसोटी

पेडणेत जणू मिनी विधानसभा निवडणूकच; दोन विद्यमान आमदारांची लागणार कसोटी

निवृत्ती शिरोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : लोकसभेची जरी निवडणूक असली, तरी पेडणे तालुक्यातील मांद्रे, पेडणे या दोन्ही मतदारसंघांत मात्र मिनी विधानसभेची निवडणूक ठरणार आहे. उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांची कसोटी लागणार आहे. तसेच मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचीही महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. या मताधिक्यावरून पुढील राजकीय रणनीती अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची कसोटी ठरणार आहे. दोन्ही आमदारांना अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जिवाचे रान करावे लागेल, ही वस्तुस्थिती आहे.

आमदार जीत आरोलकर आणि आमदार प्रवीण आर्लेकर या दोघांनाही जास्तीत जास्त मते भाजपच्या बाजूने वळवण्यास यश मिळायला हवे. अन्यथा दोघांचेही भवितव्य भाजपच्या नजरेतून धोक्यात येऊ शकते. कारण, राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू आणि मित्र नसतो. पक्षनिष्ठता ठेवणाऱ्यांना सत्तास्थानी येताना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकसभेची निवडणूक असली तरी मतदारसंघांत विधानसभेचीच मिनी निवडणूक जणू ठरली आहे.

चित्र बदलेल का?

२५ वर्षांचा कार्यकाळ आठवला, तर केवळ एक लोकसभेची निवडणूक वगळली तर भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना सहज पेडणे मतदारसंघातून पूर्णपणे मतांची आघाडी मिळाली. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी युती होऊन राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र देशप्रभू यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी मात्र श्रीपाद नाईक यांना जितेंद्र देशप्रभू यांना पराभूत केले होते. दोन्ही समाजांची एक गठ्ठा मते त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या बाजूने झुकली तर इतर समाजाची मते ही निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांना जिंकण्याची संधी मिळू शकते.

भंडारी, मराठा मते कुणाला?

मांद्रे आणि पेडणे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भंडारी समाजाची मते, तर दुसऱ्या क्रमांकावर मराठा समाजाची मते आहेत. भंडारी समाजाचे नेते म्हणून श्रीपाद नाईक भाजपतर्फे, तर मराठा समाजाचे नेते म्हणून रमाकांत खलप काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. त्यामुळे दोन्ही समाजांची मते दोघांनाही विभागून जाण्याची जरी शक्यता असली तरी कसोटी मात्र मतदारांचीच लागणार आहे.

पार्सेकर, सोपटे यांच्या मत?

मांद्रे मतदारसंघातील माजी आमदार दयानंद सोपटे माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगूटकर, माजी ज्यांच्या बाजूने असतील मंत्री संगीता परब यांचीही मते तोच उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यांची मते निर्णायक ठरू शकतात.

कोरगावकरांचे काय?

गत विधानसभेच्या निवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार राजन कोरगावकर यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी आमदारकी हस्तगत केली; परंतु लोकसभा निवडणुकीत मगोची मते भाजपला मिळतील की खलप आपल्या बाजूने वगळतील, याकडे लक्ष लागले आहे.

मताधिक्य न मिळाल्यास

पेडणे मतदारसंघातून जर भाजपला कमी मते मिळाली, तर आमदार आर्लेकर यांचे भवितव्य आगामी निवडणुकीत धोक्यात येऊ शकते. याची जाणीवही भाजपच्या स्थानिक नेत्यांना असल्यामुळे जास्तीत जास्त मते नाईक यांना दिली तरच भविष्यात आर्लेकर यांना मिळू शकते.

 

Web Title: goa lok sabha election 2024 it is like a mini assembly election in pedane two sitting mla will be tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.