Goa: एनडीएतील घटक मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार भाजप उमेदवारांसाठी एकत्र, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
By किशोर कुबल | Published: April 30, 2024 02:45 PM2024-04-30T14:45:20+5:302024-04-30T14:46:56+5:30
Goa Lok Sabha Election 2024: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल्याची टीका केली.
- किशोर कुबल
पणजी - भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल्याची टीका केली. ते म्हणाले की, ' आज भाजपच धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. गोव्यातील बांधवांसाठी ओसीआय प्रश्न आम्ही सोडवला. माझ्या सरकारने त्यासाठी केंद्रात सातत्याने पाठपुरावा केला. विदेशात असलेल्या गोमंतकीयांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची आमची जबाबदारी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून त्यांच्या अपयशाचे दर्शन घडते.'
महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक ॲड. रमाकांत खलप यांनी संसदेत आणले होते तर त्यांनी या विधेयकाचा पाठपुरावा का केला नाही? हे विधेयक त्यावेळी संमत का करून घेतले नाही? असा प्रश्नही सावंत यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले की आपकी बार ४०० पार नक्की आहे. मोदींनी महिलांना ३३ टक्के आरक्षण राजकीय आरक्षण दिले. गोव्यात एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. सीआरझेडच्या बाबतीत मच्छीमारांची घरे वाचवली जातील. गोव्यात ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत घरे बांधलेली आहेत त्यांची घरे सरकार पाडणार नाही याची हमी मी देतो.
' या निवडणुकीसाठी राष्ट्राचा विचार करा, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय जाहीरनाम्यात सत्तर वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या जेष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार जाहीर केले आहेत. ही एक मोठी घोषणा आहे. उलट काँग्रेसचा जाहीरनामा संभ्रम निर्माण करणारा आहे. कोणाची संपत्ती काढून कोणाला वाटणार, हे काही स्पष्ट नाही. म्हादईच्या बाबतीत काँग्रेस राजकारण करत आहेत आमच्यासाठी ती जीवनदायी आहे.' वन नेशन वन इलेक्शन, महिलांचे राजकीय आरक्षण, नागरिकत्व कायदा आदी विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच सत्तेवर येणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.