'एक्झिट पोल'च्या अंदाजाने भाजपमध्ये खुशीचा माहोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2024 07:30 AM2024-06-04T07:30:09+5:302024-06-04T07:32:17+5:30
काँग्रेसचे 'वेट अॅण्ड वॉच' आरजीकडूनही विजयाचा दावा.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला मिळतील, असे भाकीत करण्यात आल्याने भाजपमध्ये खुशीचा माहोल आहे तर दुसरीकडे काँग्रेस व आरजीही विजयाबाबत दावे करीत आहे. उत्तर गोव्यात भाजपने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी तर दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांचा २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय होईल, असा दावा केला आहे. एक्झिट पोलमधून बहुतांश चॅनेल्सनी दोन्ही जागा भाजपकडे जातील, असे म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एक्झिट पोलचे अंदाज खोटे असल्याचे म्हटले असून गोव्यात दोन्ही जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा केला आहे. आजच्या निकालानंतर भाजप आणि मोदींची 'एक्झिट' होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आरजीला ग्रामीण भागात मताधिक्क्य : मनोज परब
आरजीचे प्रमुख तथा उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार मनोज परब म्हणाले की, परप्रांतीय मोठ्या संख्येने असलेल्या शहरांमध्ये आरजीने जादा मतांची अपेक्षा ठेवलेली नाही. ग्रामीण भागातच आम्हाला जास्त मते मिळतील. ते म्हणाले की, भाजपने 'हिंदू खतरें में हैं' असा नारा लावत प्रचार केला. कॉंग्रेसने अल्पसंख्याक धोक्यात आहेत, असा प्रचार केला तर आरजीने गोवेकर धोक्यात आहेत, हे लोकांना पटवून दिले. लोक आमच्यासोबत आहेत.
दुपारपर्यंत चित्र स्पष्ट
नवा खासदार कोण? हे आज दुपारपर्यंत निकालांती स्पष्ट होणार आहे. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. दुपारी १ वाजेपर्यंत विजयी उमेदवार घोषित होतील. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी जव्यत तयारी ठेवली आहे.
महाआघाडीचा परिणाम होणार नाही : तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, आता निकालांची केवळ औपचारिकता बाकी आहे. गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी केली. या निवडणुकीत गोव्यात ही महाआघाडी आमचे काही बिघडवू शकणार नाही. तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही आम्हाला रोखू शकणार नाही.