श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांच्या भवितव्याकडे लक्ष! लोकसभा निकालाबाबत उत्कंठा पोचली शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2024 07:23 AM2024-06-04T07:23:32+5:302024-06-04T07:26:01+5:30
आपला खासदार कोण? आज होणार फैसला, दुपारी एक वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्यात भाजपने प्रथमच महिला उमेदवार व नवीन चेहरा दिल्याने पल्लवी धेपे तर उत्तर गोव्यात तब्बल सहाव्यांदा रिंगणात उतरून 'डबल हॅटट्रिक' साध्य करू इच्छिणारे श्रीपाद नाईक या दोघांच्याही भवितव्याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. निकालांबाबत कमालीची उत्कंठा असून मतदारराजाने कोणाला कौल दिला है उघड होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचीच प्रतीक्षा आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपमध्ये खुशीचा माहोल आहे. दुसरीकडे काँग्रेसही विजयाबाबत दावा करत आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी नवीन चेहरे दिले. भाजपने तर महिला उमेदवार देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली. पल्लवी यांच्या विजयाबाबत भाजप ठाम आहे. दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीसाठी दिलेला उमेदवार विरियातो फर्नांडिस सासष्टी तालुक्यात किती मते मिळवतो यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.
भाजपचे स्थानिक नेते सुरुवातीला दक्षिणेत पल्लवी ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असा दावा करत होते. दक्षिणेची जागा यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे यायला हवी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मडगावमध्ये जाहीर सभा घेण्यात आली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी ९७५५ मताधिक्क्याने विजय प्राप्त केला होता. भाजपचे त्यावेळचे उमेदवार अॅड. नरेंद्र सावर्डेकर यांना १,९१,८०६ तर सार्दिन यांना २,०१,५६१ मतें मिळाली होती. यावेळेस दक्षिण गोव्याची जागा काबीज करण्यासाठी भाजपने मोठी शक्ती लावली. त्यामुळे हा गडही भाजप काबीज करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
यावेळेस उत्तरेपेक्षा भापजने दक्षिणेत आपली सर्व ताकद लावली होती. त्यामुळेच भाजपचे सर्वच नेते, कार्यकर्ते मोठ्या विजयाचा दावा करत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पक्षाचे अन्य काही नेतेही आता मताधिक्य २५ हजारांच्या आसपास असेल, असे सांगत आहेत.
१५ ते २० हजारांचे मताधिक्क्य निश्चित: रमाकांत खलप
उत्तरेत श्रीपाद नाईक यांना एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळेल, असा भाजपचा दावा आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी विजय निश्चित असल्याचा दावा 'लोकमत'शी बोलताना केला. मी १५ ते २० हजार मतांनी निवडून येईन. देशपातळीवर काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
२५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्य दक्षिणेत मिळेल : मुख्यमंत्री
दक्षिण गोव्यात भाजपला २५हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्य मिळेल. गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा विजय होईल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागात मतदारांनी प्रचंड उत्साह दाखविला आहे. ग्रामीण भागातच ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असून ते भाजपसाठी लाभदायक आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. केंद्रातील भाजप सरकारने केलेली विकासकामे तसेच गोरगरिबांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना इतकेच नव्हे तर 'सबका साथ, सबका विकास ही मोदींनी दिलेली गॅरंटी लोकांनी उचलून धरली आहे, असेही सावंत म्हणाले.