प्रश्न कोण सोडवेल? पणजी शहरातील मतदारांसमोर विविध प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 10:29 AM2024-04-16T10:29:17+5:302024-04-16T10:30:38+5:30
भाजपच्या तुलनेत काँग्रेस संघटना पडतेय कमी, आरजीनेही वेधले लक्ष.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी पणजीत सध्या अनेक समस्या आहेत. यात सध्याच्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, धूळ प्रदूषण हा एक भाग झाला. काही भागांमध्ये आजही पाणीसमस्या आहे. अनियमित पाणीपुरवठा, तर पाणीपुरवठा झाला, तर कमी दाब असतो, सांतिनेझ खाडीचे संवर्धन, उद्यानांचा विकास, पणजी मार्केटमधील स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला चालना देणे आदींचा यात समावेश आहे. त्यामुळे हे सर्व विषय हाताळून पुढे कसे जावे, असा प्रश्न राजकीय पक्षांसमोर आहे. ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने स्ट्रॅटर्जीची गरज आहे, असा दावा आरजीने केला आहे.
२०२२मध्ये आरजी होता पाचव्या स्थानी आरजी पक्षाने २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली. तिसवाडीतील पाचही मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले. मात्र, सर्वांत कमी मते आरजीला पणजीत मिळाली. आरजीचा उमेदवार मते मिळवण्यात पाचव्या स्थानावर होता. त्यामुळे सध्या आरजीवर पक्ष पणजीत बळकट करण्याचे आव्हान आहे. कारण त्यांच्या समोर काँग्रेस, भाजप, यासारखे मोठे पक्ष आहेत, ज्यांना जनतेने स्वीकारले आहे
उजो उजो असे म्हणत विविध ज्वलंत प्रश्न घेऊन जनतेसमोर येणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने कमी वेळात गोव्याच्या राजकीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, पणजीत आरजीला अधिक बळकटीची गरज आहे. पणजीत तसे आरजीचे अस्तित्व फार नाही. त्यांचे कार्यकर्ते काम करीत असले तरी काँग्रेस व भाजपच्या तुलनेत आरजी कमी पडत आहेत. २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणूक आरजीने पणजीतून लढवली होती. मात्र, त्यांना ५०० मतांचा आकडाही गाठता आला नव्हता. अशातच पणजीतून लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे