गोवा मराठी चित्रपट महोत्सव 8 जूनपासून, कृतज्ञता पुरस्कार लॉर्ना यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 09:11 PM2018-05-05T21:11:12+5:302018-05-05T21:11:12+5:30
गोवा मराठी चित्रपट महोत्सवास 8 जूनपासून सुरूवात होणार आहे.
पणजी : विन्सन वर्ल्डच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवास 8 जूनपासून सुरूवात होणार आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार असून, महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणारा कृतज्ञता पुरस्कार यंदा गोव्यातील प्रख्यात गायिका लॉर्ना यांना देण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानेश मोघे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेस संजय शेट्ये, श्रीकांत शेट्ये आणि सिद्धेश म्हाबंरे यांची उपस्थिती होती. मोघे म्हणाले की, हा महोत्सव तीन दिवस चालेल. या चित्रपट महोत्सवाच्या उद्घटनासाठी आम्ही प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याशी संपर्क साधला आहे. महोत्सवाच्या शुभारंभाला सुमित्र भावे व सुनील सुखथनकर यांच्या ‘वेलकम होम’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाने होईल. महोत्सवाचा अवधी कमी आणि चित्रपट जास्त असे दिसते, त्यामुळे आणखी एक दिवस वाढविण्याचा विचार का होत नाही, याप्रश्नावर मोघे म्हणाले की प्रायोजक मिळणे अवघड होते. महोत्सवासाठी पदरमोड करावी लागते. तरीही आम्ही गेली दहावर्षे यशस्वीपणो हा महोत्सव पार पाडला आहे.
संजय शेट्ये म्हणाले की, या महोत्सवाला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शकांची उपस्थिती राहणार आहे. रसिकांनी आत्तापर्यंत या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद दिला असून, यावर्षी आम्ही चार ठिकाणी चित्रपट दाखविण्याची सोय केलेली आहे. मॅकेनिझ पॅलेस, आयनॉक्स, कला अकादमी आणि वास्कोतील ‘1930’ या चित्रपटगृहात महोत्सवातील चित्रपट दाखविले जातील. या महोत्सवासाठी सदस्य नोंदणी 14 मे पासून सुरू होणार असून, बुकमायशो डॉट कॉमवरून कोणालाही शो बुक करता येऊ शकेल. सदस्यत्वासाठी आठशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
महोत्सवात दाखविण्यात येणारे चित्रपट व कंसात दिग्दर्शकाचे नाव
पिंपळ (गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (धोंडिबा कारंडे), इडक (दीपक गावडे), गुलाबजाम (सचिन कुंडलकर), न्यूड (रवी जाधव), बबन (भाऊसाहेब कऱ्हाडे), आम्ही दोघी (प्रतिमा जोशी), झिपऱ्या (केदार वैद्य), कच्च लिंबू (प्रसाद ओक), लेथ जोशी (महेश जोशी), रणांगण (राकेश सारंग), बकेट लिस्ट (तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (सारंग वंजारी), व्हॉट्सअप लग्न (विश्वास जोशी), कोकणी चित्रपट ‘जुडो’ (मिरांशा नाईक) आणि लघुपट सत्यजीत रे : लाईफ अॅण्ड वर्क (विशाल हळदणकर).