गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 07:47 AM2024-01-06T07:47:06+5:302024-01-06T07:47:51+5:30

गोमंतकीय मराठी पत्रकारितेलाही दीडशे वर्षांचा इतिहास असताना मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी मराठी पत्रकारांची संस्था नसावी हे दुर्दैव.

goa marathi journalist association should be revived | गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे!

गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे!

वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

आज मराठी पत्रकार दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्र आणि गोव्याव्यतिरिक्त अन्य काही भागातही आद्य मराठी पत्रकार बाळ गंगाधर ऊर्फ बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती जपण्याच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम मराठी पत्रकारांच्या संस्था या दिवशी हटकून करतात. 'दर्पण' या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिजी व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. 

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडवण्यात बाळशास्त्रींचा वाटा खूप मोठा होता. त्यांच्या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच 'दर्पण'चा जन्म झाला आणि मराठी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव कायम राहिले. त्यांच्या स्मृती जपतच मराठी पत्रकारिता पुढील वाटचाल करत आहे आणि मराठी पत्रकारितेसाठी 'दर्पण'कार आजही निश्चितच प्रेरणास्थान बनून राहिले आहेत. मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी मराठी पत्रकारदिनी शानदार समारंभ आयोजित करून दिग्गज पत्रकारांच्या नावे असलेले पुरस्कार प्रदान करताना आपण पाहतो, तेव्हा गोव्यात अशा कार्यक्रमाची मागील दोनेक दशके असलेली वानवा जाणवल्याविना राहात नाही. गोव्यातही मराठी पत्रकारांची संख्या आजच्या घडीला निश्चितच लहान नाही. पण, या सगळ्यांना एकत्र आणू शकणारा गोवा मराठी पत्रकार संघ आपले अस्तित्वच मागील दोनेक दशके घालवून बसला आहे आणि आज मराठी पत्रकारदिनी त्याचेच शल्य अधिक आहे.

गोव्यातही मराठी पत्रकार दिनानिमित्त दोनेक कार्यक्रमांचे आयोजन झाले असले तरी केवळ एक सोपस्कार यापलीकडे त्याचे वर्णन करता येणार नाही. गोमंतक साहित्य सेवक मंडळ असो वा गोमंतक मराठी अकादमी (शासकीय मान्यता नसलेली), यांनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकारांना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याबद्दल या संस्थांचे कौतुकही करावे लागेल. तरी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी गोव्यात मराठी पत्रकारांची संस्था नसावी हे मात्र पचनी पडत नाही. गोमंतकीय मराठी पत्रकारितेलाही साधारण दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास असल्याने मराठी पत्रकार दिन साजरा करण्याच्या आघाडीवर गोव्यातील मराठी पत्रकारांमध्ये एवढी उदासीनता का दिसून यावी हे कळायला मार्ग नाही.

गोव्यातील मराठी पत्रकारितेची वाटचाल एवढी सुलभ होण्याकरिता ज्यांनी निर्भयपणे पोर्तुगीज राजसत्तेशी नेहमीच संघर्ष केला, अशा अनेक पत्रकारांची नावे घेता येतील, 'भारत'कार गोविंद पुंडलिक हेगडे देसाई, डॉ. पुरुषोत्तम वामन शिरगावकर (प्रभात), ना. भा. नायक (भारतमित्र), करंडेशास्त्री (सत्संग) आदींनी अपार हालअपेष्टा सोसूनही पत्रकारितेचे व्रत कसे अखंड सुरू ठेवले हा इतिहास समोर असतानाही गोव्यात आज मराठी पत्रकारांसाठी व्यासपीठ देणारी एकही संस्था नसावी याची खंत वाटते.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाने मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमाचे आयोजन करून मराठी पत्रकारितेत भरीव योगदान दिलेल्या काही पत्रकारांचा सत्कार करून आपली जबाबदारी पार पाडली, तर प्रदीप घाडी आमोणकरांच्या मराठी अकादमीने 'दर्पण'कारांच्या स्मृती जपण्याकरिता आज पर्वरीत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचाही उल्लेख करावा लागेल. आज शरपंजरी पडलेल्या गोवा मराठी पत्रकार संघालाही तसा गौरवशाली इतिहास आहे. मागील दोनेक दशके हा संघ निष्क्रिय राहण्यामागे अनेक कारणे असतील, पण ती आज येथे उगाळत बसणे हे या लेखाचे प्रयोजन नाही; तर असले नसलेले सगळे समज, गैरसमज, मतभेद पूर्णपणे बाजूला ठेवून या संघाचे पुनरुज्जीवन कसे करता येईल, याकरिता पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि त्याकरिता पहिले पाऊल उचलण्याचीही आमची तयारी आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राचे तत्कालीन प्रमुख स्व. प्रभाकर भुसारी यांची आठवण यानिमित्ताने आवर्जून होते, ज्यांनी गोवा मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेसाठी केंद्राच्या सभागृहात बैठक घेण्यास अनुमती दिली व तेथूनच गोवा मराठी पत्रकार संघाची वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. स्व. वामन राधाकृष्ण, स्व. सीताराम टेंगसे, र. वि. प्रभूगावकर, रमेश कोलवाळकर, जयंत संभाजी अशा अनेकांनी गोवा मराठी पत्रकार संघाचे कार्य एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाण्याकरिता दिलेले योगदान विसरता येणार नाही.

मुक्तीनंतर या प्रदेशात मराठी पत्रकारिता खऱ्या अर्थाने बहरत गेली हे नाकारता येणार नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी गोव्याबाहेरील शहरातील मराठी दैनिकेही येथे रुळत गेली; पण दुर्दैव असे की, मराठी पत्रकारांसाठी आज आपल्या गोव्यात एकही व्यासपीठ नाही. ज्यायोगे मराठी पत्रकारदिनी आम्ही एकत्र येऊन 'दर्पण'कारांना आदरांजली वाहू शकू. मराठी पत्रकारितेचा इतिहास पत्रकारांच्या नव्या पिढीपर्यंत जाण्याकरिता अशा व्यासपीठाचे माध्यम आज खूप गरजेचे आहे. गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मराठी पत्रकारांनी पुढाकार घेतल्यास 'दर्पण'कारांसाठी ती खऱ्या अर्थाने आदरांजली ठरावी. मुंबईत आज होणाऱ्या समारंभात आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार, विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार, नवसंदेशकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान करून प्रतिभावान मराठी पत्रकारांचा गौरव होत आहे. आपल्या गोव्यातही हे सर्व होऊ शकते; पण त्यासाठी थोडी इच्छाशक्ती आणि जिद्द हवी. गोव्यातील मराठी पत्रकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज आहे.
 

Web Title: goa marathi journalist association should be revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा