गोमेकॉ किडणी स्वीकारू शकले नाही, याची खंत - विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 08:54 PM2018-04-10T20:54:16+5:302018-04-10T20:54:16+5:30
गोव्यातील अत्यंत महत्त्वाचे सरकारी इस्पितळ असलेले बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ (गोमेकॉ) ब्रेन डेड रुग्णाचे एक मूत्रपिंड स्वीकारू शकले नाही.
पणजी : गोव्यातील अत्यंत महत्त्वाचे सरकारी इस्पितळ असलेले बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ (गोमेकॉ) ब्रेन डेड रुग्णाचे एक मूत्रपिंड स्वीकारू शकले नाही. गोमेकॉ इस्पितळ त्याविषयी अपयशी ठरले याची खंत वाटते, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी येथे सांगितले.
वास्कोतील सदाशिव राव ह्या 60 वर्षीय रुग्णास ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यास दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात ब्रेन डेड म्हणून चार तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले. गोमेकॉ इस्पितळाचेही दोन डॉक्टर त्यात होते. त्यानंतर आवश्यक कायदेशीर सोपस्कार पार पाडून या रुग्णाचे यकृत व दोन मूत्रपिंडे काढून घेतली गेली. मुंबई येथील ग्लोबल इस्पितळाच्या डॉक्टरांचे पथक त्यासाठी मणिपालच्या इस्पितळात आले होते. गोमेकॉ इस्पितळ एक किडणी घेऊ शकले असते. गोमेकॉ इस्पितळाने जर मूत्रपिंड स्वीकारून दुस-या एखाद्या रुग्णाच्या शरीरात त्याचे रोपण केले असते तर एखाद्या गोमंतकीय रुग्णाचे प्राण वाचले असते. या उलट दोन्ही मूत्रपिंडे व यकृत मुंबईतील तीन वेगवेगळ्य़ा इस्पितळांना द्यावी लागली. परप्रांतातील रुग्णांचे त्यामुळे जीव वाचण्यास मदत झाली.
गोमेकॉ इस्पितळाच्या काही डॉक्टरांनी एक मूत्रपिंड स्वीकारण्यासाठी सगळी तयारी केली होती पण त्यात काय यश आले नाही, कुणाच्या अकार्यक्षमतेमुळे गोमेकॉ अयशस्वी ठरली असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. गोमेकॉचे काही डॉक्टरही नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या एकूण विषयात चौकशी करण्याचा आदेश आरोग्य खात्याशी निगडीत अधिकारी व काही डॉक्टरांना दिला आहे. गोमेकॉत आवश्यक सुविधा नसल्याने की आणखी कोणत्या कारणास्तव हे घडले ते चौकशीअंती स्पष्ट होऊ शकेल.
मंत्री राणे यांनी मंगळवारी येथे सांगितले, की चौकशी काम सुरू झाले आहे. गोमेकॉ इस्पितळ अपयशी ठरले, हे मी मान्य करतो व त्याविषयी वाईटही वाटते. गोव्यातील एखाद्या रुग्णाचे प्राण आम्ही वाचवू शकलो असतो. गोमेकॉ अपयशी का ठरले ते आम्हाला कळायला हवे. मणिपाल इस्पितळ यशस्वी ठरल्याबाबत आनंदही वाटतो. अवयव हाव्रेस्ट करणे व त्याचे रोपण करण्याच्या कामासाठी सरकार मणिपाल इस्पितळाला नोंदणी देण्याचाही विचार करत आहे.