गोमेकॉत 'आयव्हीएफ' उपचार; देशातील पहिले सरकारी इस्पितळ, १ सप्टेंबरपासून मोफत सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:03 AM2023-08-15T11:03:35+5:302023-08-15T11:04:43+5:30
गोमेकॉ येथील आयव्हीएफ उपचार पद्धतीचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'आयव्हीएफ' उपचार पद्धती सुरू करणारे गोमेकॉ इस्पितळ हे देशातील पहिले सरकारी इस्पितळ बनले आहे. सदर उपचार हे पूर्णपणे मोफत असून, त्याची सुरुवात १ सप्टेंबरपासून होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.
गोमेकॉ येथील आयव्हीएफ उपचार पद्धतीचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडे, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. केदार फडते व अन्य हजर होते.
मंत्री राणे म्हणाले की, गोमेकॉत सुरुवात केलेल्या या आयव्हीएफ उपचार पद्धतीमुळे मूल नसलेल्या अनेक जोडप्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे गोमंतकीयांचे लाखो रुपये वाचणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हायटेक आरोग्यसेवा हेच ध्येय : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ज्या जोडप्यांना मूल होण्यास अडचणी येतात. त्यांच्यासाठी ही सुविधा लाभदायक ठरेल. आयव्हीएफ उपचार पद्धती गोमेकॉत सुरू झाली असून, त्यासाठी डॉ. केदार फडते यांचे सहकार्य मिळणार आहे. शहरी, तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवणे, सुपर स्पेशालिटी इस्पितळांची उभारणी करण्याचे काम सरकार करणार आहे. त्याचबरोबर परिचारिकांना पदव्युतर अभ्यासक्रमासाठी मंबई येथील टाटा मुबइ कॅन्सर मेमोरियल इस्पितळातही प्रशिक्ष- णासाठी पाठवत असल्याचे ते म्हणाले.
आयव्हीएफ उपचारांसाठी जोडप्यांना गोव्याबाहेर जावे लागते. त्यावर लाखो रुपये खर्च येतो. मात्र, आता हाच सुविधा गोमेकॉत सुरु केल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी गोव्याबाहेर जाण्याची गरज नाही.
१०० जोडप्यांनी केली नोंदणी
गोमेकॉतील आयव्हीएफ उपचार पद्धतीसाठी आतापर्यंत ५० ते १०० जोडप्यांनी नोंदणी केली आहे. या उपचारांवर सरासरी ५ ते ७ लाख रुपये खर्च येतो. हा सर्व खर्च सरकार पेलणार आहे. आयव्हीएफ उपचारांसाठी आवश्यक असलेली उपकरणे खरेदी व सदर उपक्रम सशक्त्त उप करण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी वापरण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.