गोवा खनिज घोटाळा : पिटर जेकबविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 11:42 AM2017-11-04T11:42:51+5:302017-11-04T11:43:21+5:30
500 कोटी रुपयांच्या खनिज घोटाळा प्रकरणात खनिज ट्रेडर पिटर जेकब याच्या विरुद्ध पणजी प्रधान सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावला आहे.
पणजी - 500 कोटी रुपयांच्या खनिज घोटाळा प्रकरणात खनिज ट्रेडर पिटर जेकब याच्या विरुद्ध पणजी प्रधान सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावला आहे. जामीनवर सुटलेल्या जेकबचा जामीन रद्द करण्यासाठी एसआयटीने न्यायालयात याचीका दाखल केली होती. परंतु जेकब न्यायालयात गैरहजर राहत असल्यामुळे हा अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या खनजिज घोटाळा प्रकरणात बेकायदेशीरपणे खनिजाची आयात करण आणि गोव्यातील खाण मालकांना रॉयल्टी बुडवून खनिज निर्यात करण्यास मदत करणे असे ठपके त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्याला अटक केल्यानंतर काही दिवसांनी त्याची जामीनवर सुटका झाली होती. त्यामुळे त्यांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटीने प्रयत्न सुरू केले होते.
जेकबची कोठडीतील चौकशी एसआयटीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून गोव्यातील काही खाण मालकांचे कारनाम्यांचा तो साक्षीदार आहे. या खाण मालकांचे बरेच व्यवहार जेकबने केले होते. खाण मालकांकडून खनिजे विकत घेऊन ते निर्यात करण्याची कामे केली होती. तसेच जेकबशी या खाण मालकांनी केलेले आर्थिक व्यवहारही उघड झाले आहेत आणि त्याचे कागदोपत्री पुरावेही एसआयटीकडे उपलब्द आहेत. त्यामुळे जेकबची एसआयटीला कोठडी मिळणे म्हणजे खाण मालक अडचणीत येणे असा त्याचा सरळसरळ अर्थ होत आहे