खाणप्रश्नी ‘सुप्रिम’ सहानुभूतीसाठी उद्यापासून तीन दिवस अवलंबित ‘जंतरमंतर’वर बसणार - पुती गांवकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:13 PM2019-04-08T19:13:06+5:302019-04-08T19:13:30+5:30
गोव्यातील खाणींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा यासाठी सुमारे ४00 खाण अवलंबित उद्या मंगळवार ९ पासून पुढील तीन दिवस नवी दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर बसणार आहेत.
पणजी - गोव्यातील खाणींच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा यासाठी सुमारे ४00 खाण अवलंबित उद्या मंगळवार ९ पासून पुढील तीन दिवस नवी दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर बसणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात याचिका सुनावणीस यायची आहे.
गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे निमंत्रक पुती गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘ सर्वोच्च न्यायालयलाने अवलंबितांबाबत सहानुभूती दाखवून निवाडा द्यावा एवढीच अपेक्षा आहे. ही निदर्शने किंवा धरणे आंदोलन नसून कोणावर दबाव घालण्यासाठीही आम्ही हे करीत नाही.’
सुमारे ३00 अवलंबित दिल्लीत पोचले असल्याचे व आज उद्या आणखी १00 जण येतील, अशी माहिती त्यांनी या प्रतिनिधीला दिली. खाण कंपन्यांनी मायनिंग कन्सेशन रद्द करणाºया १९८७ च्या कायद्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पोर्तुगीजांच्या काळात ही मायनिंग कन्सेशन देण्यात आली होती.
पुती गांवकर म्हणाले की, ‘ राज्यातील खाणी पूर्ववत सुरु कराव्यात ही आमची मुख्य मागणी आहे. यासंदर्भात गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही ( इंटरलॉक्युटरी अॅप्लिकेशन) सादर केलेली आहे त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी (२0१८) फेब्रुवारीमध्ये राज्यातील ८८ खाण लिजेस् रद्दबातल ठरविल्या आणि १५ मार्चपासून खनिज उत्खननावर बंदी घातली. तेव्हापासून राज्यातील खाणी बंदच आहेत.
दरम्यान, मायनिंग कंपन्यांची याचिका १५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येण्याची शक्यता आहे.