मंत्री 'सत्य' बोलतात; कायदामंत्र्यांचे विधान अन् मुख्यमंत्र्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 08:21 AM2024-08-17T08:21:30+5:302024-08-17T08:21:55+5:30
आलेक्स सिक्वेरा यांचे हे विधान ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अडचण झाली.
अलीकडे गोव्यात काही मंत्री व आमदार सत्य बोलण्याचे धाडस करू लागले आहेत. मायकल लोबो यांनी 'ऑल इज नॉट वेल' असे सांगून सरकारच्या राजकीय अनारोग्याकडे बोट दाखवले होते. परवा चक्क राज्याचे कायदा मंत्री बोलले की- गोव्यात सगळीकडे ड्रग्ज सहज उपलब्ध होतात. ड्रग्ज मिळण्यासाठी फक्त सनबर्नच्या आयोजनापर्यंतच थांबावे लागते असे नाही तर सगळीकडे ड्रग्ज आहेत. आलेक्स सिक्वेरा यांचे हे विधान ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अडचण झाली. कारण गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि पोलिसांचे तर कायम म्हणणे असते की- आम्ही ड्रग्ज व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे; मात्र कायदा मंत्री सिक्वेरा यांनी इग्ज आर फ्रीली अव्हेलेबल असे फक्कड इंग्लिशमध्ये सांगून टाकले.
सिक्वेरा यांनी गुरुवारी आपले विधान मागे वगैरे घेतले नाही. आपण चुकून बोललो किंवा स्लीप ऑफ टंग झाले, असा दावा सिक्वेरा यांनी गुरुवारी तरी दिवसभर केला नाही. सिक्वेरा तसे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्धच आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र धावपळ करत गुरुवारी सायंकाळी दावा केला की- सिक्वेरा यांचे वाक्य वेगळे आहे. त्यांचे स्लीप ऑफ टंग झाले. प्रत्यक्षात जगात सगळीकडे ड्रग्ज उपलब्ध आहेत असे सिक्वेरा सांगू पाहतात. मुख्यमंत्र्यांनी हा नवा जगावेगळा दावा केला तरी, गोमंतकीयांना काय समजायचे ते समजले आहे. अर्थात, कोणत्याही सरकारप्रमुखाला अशी कसरत करावीच लागते.
आलेक्स सिक्वेरा यांनी आपल्या विधानाविषयी गुरुवारी रात्रीपर्यंत तरी खुलासा करणे टाळले. शुक्रवारी दुपारी मीडियाने त्यांना पुन्हा विचारल्यानंतर आलेक्स सिक्वेरा यांनी स्वतःला थोडे सावरले. त्यांना परिस्थितीची कल्पना आली. एक मंत्रीच जेव्हा ड्रग्ज सगळीकडे मुक्तपणे उपलब्ध आहेत, असे म्हणतो तेव्हा अर्थ काय होतो हे सिक्वेरा यांना दुसऱ्या दिवशी कळले. त्यांनी मग थोडी दुरुस्ती केली. मी ड्रग्ज सगळीकडे मिळतात, असे म्हणालो होतो आणि सगळीकडे म्हणजे जगात सगळीकडे असादेखील अर्थ होतो. मी केवळ इथे गोव्यातच मिळतात असे म्हणालो नव्हतो, अशी नवी भूमिका त्यांनी मांडली आहे. एक खोटे लपविण्यासाठी मग शंभरदा खोटे बोलावे लागते, अशा अर्थाची एक म्हण आहे.
गोव्यातील काही मंत्र्यांना ती लागू होते. मीडियाने सनसनाटी केली असे सांगून सिक्वेरा यांनी तात्पुरती स्वतःची सुटका करून घेतली आहे. बुडत्याचा पाय खोलात जाण्यापूर्वी सिक्वेरा निसटले आहेत. त्यांनी ड्रग्जच्या विरोधात आपण लढूया, ड्रग्जबाबत कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य करूया, अशीदेखील भूमिका मांडली आहे. मंत्र्यांची ही कसरत छान, गोमंतकीयांचे मनोरंजन करणारी आहे; पण सनबर्नला मात्र हे मंत्री महाशय विरोध करत नाहीत. त्यांच्याच लोटली मतदारसंघात वेर्णा येथे यंदा सनबर्न व्हायला हवा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
लोकांच्या आक्रमक भूमिकेनंतर तेथील ग्रामपंचायतीने सनबर्नला विरोध केला आहे; पण मंत्री सिक्वेरा यांनी विरोधाची भूमिका घेतलेली नाही. गोव्यातील विद्यार्थ्यांना ते सल्ला देतात की- मुलांनो ड्रग्जपासून दूर राहा; पण सनबर्नच्या विरोधात 'ब्र'ही काढत नाहीत. ड्रग्ज केवळ सनबर्नवेळीच मिळतात असे नाही, असे ते सांगतात. सनबर्नवेळी ड्रग्ज उपलब्ध होऊ नये म्हणून उपाययोजना करायला हवी, असे सुचवून आता ते नामानिराळे होऊ पाहत आहेत.
भाजपच्या राज्यात गोव्याला असे एक-एक मंत्री मिळाले आहेत, हे गोव्याचे भाग्यच नव्हे काय? आपण गोयंकारांनी निश्चितच काही तरी पुण्य केलेले असेल म्हणून तर आपल्या वाट्याला असे काही मंत्री आले आहेत. 'थोडे कुट्ट करा' असा जाहीर सल्ला देणारे मंत्री आहेत. बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, हे ठाऊक असतानादेखील रस्त्यांवरील खड्ड्यांना वैतागलेले मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणतात की-सुदिन ढवळीकर चांगले बांधकाम मंत्री होते. खरे म्हणजे मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक करावे लागेल.
कारण ते बिचारे आलेक्स सिक्वेरा, रवी नाईक, गोविंद गावडे, बाबूश वगैरे अनेक पराक्रमी मंत्र्यांना सांभाळण्याची स्मार्ट कसरत करत आहेत. काही मंत्रीच आता थेट व सत्य बोलू लागल्याने गोव्यात सनबर्न येण्यापूर्वीच रामराज्याची सुरुवात झाली आहे, असेदेखील समजता येते.