गोव्याच्या मंत्र्याला सेक्स स्कँडलच्या आरोपाने घेरले, विनोद पालयेकर अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 10:01 AM2017-11-07T10:01:52+5:302017-11-07T10:21:16+5:30
गोव्याचे मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर हे सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याचा आणि त्याविषयीची चित्रफितही उपलब्ध असल्याचा अत्यंत गंभीर व सनसनाटी आरोप हायकोर्टाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीज यांनी केला आहे.
पणजी - गोव्याचे मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर हे सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याचा आणि त्याविषयीची चित्रफितही उपलब्ध असल्याचा अत्यंत गंभीर व सनसनाटी आरोप हायकोर्टाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीज यांनी केल्यानंतर गोव्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष या विषयाने वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरही त्याबाबतची चर्चा तापली आहे. मात्र, मंत्री पालयेकर यांनी आरोप फेटाळले आहेत. आपण ड्रग माफियांविरूद्ध भूमिका घेतल्यामुळे आपल्याविरुद्ध बदनामीची ही मोहीम उघडली गेली असल्याचे पालयेकर यांचे म्हणणे आहे. मात्र आयरिश रॉड्रीग्ज यांनी आपण या प्रकरणी येत्या आठवड्यात राज्यपालांना भेटून सेक्स स्कँडलविषयी तक्रार करू व पालयेकर यांच्याविरुद्ध पुरावा सादर करणार, असे जाहीर केले आहे.
मंत्री पालयेकर यांचा गोवा फॉरवर्ड हा पक्ष मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक आहे. या पक्षाचे अध्यक्ष असलेले मंत्री विजय सरदेसाई यांनी मंत्री पालयेकर यांना पाठिंबा दिला असून आयरिश रॉड्रीगीज हे ड्रग माफियांच्याबाजूने राहून पालयेकर याना आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला नाहक बदनाम करत असल्याचे म्हटले आहे.
गोवा सरकार अगोदरच विविध अंतर्गत वादामुळे त्रस्त आहे. त्यात आता सेक्स स्कँडलच्या वादाची भर पडल्यामुळे मंत्रिमंडळातही थोडी खळबळ उडाली आहे. मंत्री पालयेकर हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडून आले आणि आमदार व मंत्री बनले. त्यांनी रात्री उशीरा मोठ्या संगीताच्या नादात चालणाऱ्या पार्टीज् बंद कराव्या व ड्रग व्यवसायाचे किनारपट्टीत उच्चाटन केले जावे, अशी मागणी सातत्याने केली होती. त्याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिसांना कारवाई करण्यासही भाग पाडले होते. तथापि त्यांच्याविरुद्ध झालेला सेक्स स्कँडलचा गंभीर आरोप हा त्यांची स्वतःचीही कसोटी पाहणारा ठरला आहे. आपल्या जिवाला ड्रग माफियांकडून धोका संभवत असल्याचे विधान दोन महिन्यांपूर्वी करून पालयेकर यांनीही खळबळ उडवून दिली होती.
पालयेकर हे त्यांच्या शिवोली या मतदारसंघातील एका महिलेसोबत नग्न अवस्थेत चित्रफितीमध्ये दिसून येत आहेत असा आयरिश राॅड्रीगीज यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यानी अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवावे की नाही याचा निर्णय घ्यावा असेही रॉड्रीगीज यांनी म्हटले आहे. सीडी असल्यास ती दाखवावी असे आव्हान मंत्री पालयेकर यांनी रॉड्रीगीज यांना दिले आहे तर मंत्री सरदेसाई यांनी रॉड्रीगीज यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा कायदेशीर दावा करू, असा इशारा केला आहे.
सध्या सोशल मीडियावर सेक्स स्कँडलचा हा वाद उलटसुलट चर्चेचा विषय बनला आहे. आपण सरदेसाई यांचे आव्हान स्वीकारत असून त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा करावाच असे रॉड्रीगीज यांनी म्हटले आहे.