गोव्याचे आमदार डिसोझा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:24 PM2019-02-14T23:24:17+5:302019-02-14T23:24:24+5:30
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व म्हापसा मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे गुरुवारी सायंकाळी पणजीतील एका खासगी इस्पितळात निधन झाले.
पणजी : गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व म्हापसा मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे गुरुवारी सायंकाळी पणजीतील एका खासगी इस्पितळात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 होते. डिसोझा यांच्या निधनाबाबत भाजपसह सर्वच पक्षांनी व अनेक मंत्री, आमदारांनी दु:ख व्यक्त केले.
मनमिळावू स्वभावाचे डिसोझा हे 1999 सालापासून सातत्याने म्हापसा मतदारसंघातून निवडणुका जिंकत आले. गेले वर्षभर ते अधूनमधून आजारी असायचे. त्यांना कॅन्सर झाला होता व त्यासाठी अमेरिकेतील इस्पितळातही तीन महिने उपचार घेऊन ते आले होते. तत्पूर्वी त्यांच्यावर किडनी रोपणाचीही शस्त्रक्रिया झाली होती. आता आपण बरे आहोत, असे डिसोझा यांनी गेल्या महिन्यात लोकमतला सांगितले होते पण त्यांची प्रकृती अलिकडे 20 दिवसांत बिघडली. त्यांना पणजीतील इस्पितळात पंधरा दिवसांपूर्वी दाखल केले होते व आठ दिवस त्यांना वेन्टीलेटरवर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. डिसोझा यांची प्राणज्योत सायंकाळी मालवली व गोवा विधानसभेची सदस्य संख्या आणखी एका आमदाराने कमी झाली. एकूण चाळीस सदस्यीय विधानसभा आता 37 सदस्यांची राहिली असून दोघांनी पूर्वीच आमदारकीचे राजीनामे दिले आहेत.
डिसोझा हे आजारी असल्याने व काम करू शकत नसल्याने गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांना मंत्रिपदावरून डच्चू देण्यात आला होता. त्यावेळी डिसोझा यांनी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्यावर टीका केली होती. डिसोझा हे गेल्या विधानसभा अधिवेशनासही उपस्थित राहू शकले नाही. डिसोझा हे 2002 सालापासून भाजपचा चेहरा बनले होते. त्यांना 2013 च्या सुमारास उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. डिसोझा यांनी 2014 साली मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. गोव्याचे माजी उपसभापती व माजी आमदार विष्णू वाघ यांचे बुधवारीच निधन झाले.