...तर गोव्यात सलग चौथ्यांदा तुटीचा मान्सून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 07:58 PM2018-08-22T19:58:01+5:302018-08-22T19:58:38+5:30
आतापर्यंतचा राज्यातील पाऊस हा १५ टक्के तुटीचा पाऊस ठरला आहे, त्यामुळे येत्या ४० दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडला नाहीतर सतत चौथ्यावर्षीही तुटीचा मान्सून ठरणार आहे.
पणजी - आतापर्यंतचा राज्यातील पाऊस हा १५ टक्के तुटीचा पाऊस ठरला आहे, त्यामुळे येत्या ४० दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडला नाहीतर सतत चौथ्यावर्षीही तुटीचा मान्सून ठरणार आहे.
गोव्यात सामान्य पावसाचे प्रमाण आहे ११७ इंच एवढे. २०१४ साली मिळालेला १२० इंच पाऊस हा शेवटचा सामान्य प्रमाण ओलांडणारा पाऊस ठरला आहे. त्यानंतरचा पाऊस हा कामय तुटीचा ठरला आहे. यंदा सामान्य मन्सूनचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु आतापर्यंत पडलेला पाऊस हा सामान्य प्रमाणापेक्षा १५ टक्के मागे आहे. ही तूट भरून न आल्यास यंदाही तूटीचाच मान्सून ठरणार आहे.
मागील चार वर्षांत गोव्यात पडलेला पाऊस हा मान्सूनी तूटच दाखवीत आहे. यंदाही तीच परिस्थिती आहे. आॅगस्टचा तिसरा आठवडा संपल्यानंतरही केवळ ८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. असे प्रमाण राहिल्यास फार तर इंचाचे शतक ओलांडले जाऊ शकेल, परंतु तूट भरून निघणार नाही, उलट वाढण्याची शक्यता आहे.
वर्ष २०१७मध्ये बरोबर १०० इंच पाऊस पडला होता. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यातही ही तूट २४ टक्के एवढी होती. परंतु महिना संपता संपता बंगालच्या उपसागरावर उंच हवेत निर्माण झालेल्या ‘सर्क्युलेशन’ प्रक्रियेमुळे गोव्याहीत शेजारच्या राज्यांत जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे मोसमी पावसाची तूट ही जवळ जवळ निम्मी घटून २४ टक्क्यांवरून १४ टक्क्यंवर आली होती. पावसाच्या सुरूवातीला व संपण्याच्यावेळी अशा प्रकारची सर्क्युलेशन प्रक्रिया, वादळे, चक्रीवादळे वगैरे निर्माण होण्याचा शक्यता खूप असतात. यंदा मान्सूनच्या सुरूवातीलाही चक्रिवादळ निर्माण झाले होते. पाऊस संपतानाही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडल्यास निर्माण झालेली तूट भरून येण्याची शक्यता आहे.
वर्ष पाऊस इंचात लाभ/तूट
२०१४ १२०.५ +३
२०१५ ९४.३ -२०
२०१६ १११.४ -१
२०१७ १००.६ -१४
२०१८ ०८५.७ -१५ (२१आॅगस्टपर्यंत)