मुसळधार पावसामुळे गोवा-मुंबई, गोवा-बंगळुरू आंतरराज्य बस वाहतूक कोलमडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:39 PM2019-08-07T19:39:54+5:302019-08-07T19:40:10+5:30
धुवांधार पावसामुळे वाढलेले पाणी आणि घाटात कित्येक ठिकाणी कोसळलेल्या दरडी यामुळे गोवा-मुंबई आणि गोवा-बंगळुरू या आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा फटका प्रवाशांना बसला.
मडगाव - धुवांधार पावसामुळे वाढलेले पाणी आणि घाटात कित्येक ठिकाणी कोसळलेल्या दरडी यामुळे गोवा-मुंबई आणि गोवा-बंगळुरू या आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा फटका प्रवाशांना बसला. गोव्यात दररोज बंगळुरुहून 50 ते 60 प्रवासी बसेस येत असतात. मात्र बुधवारी मडगावात केवळ यापैकी आठच बसेस दाखल झाल्या.
बस वाहतूक बंद असल्यामुळे रेल्वे प्रवासावर ताण आला होता. कोंकण रेल्वेचा मार्ग बुधवारी सुरळीत झाला असला तरी गाडय़ा दोन ते तीन तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांच्या वेळापत्रक कोलमडले. त्याशिवाय गोव्यात येणा:या भाजी व दुधावरही परिणाम झाला. परराज्यातील दुध व भाजी गोव्यात न पोहोचल्याने गोव्यातील गोवा डेअरी व सुमूलच्या दुधाची मागणी वाढल्याने त्यांचेही नियोजन कोलमडले.
जॉली बस ट्रॅव्हल्सचे अँथनी रॉड्रीगीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, मुंबई - कोल्हापूर महामार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरुन येणा:या सर्व बसेस बंद होत्या. तर बंगळुरुहून येणा:या आठ बसेस शिमोगामार्गे मडगावात दाखल झाल्या. यल्लापूर येथे पाणी वाढल्याने सर्व वाहतूक बंद झाली असून तेथील आपदग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राधानगरी-कोल्हापूर येथे गोव्याच्या ज्या दहा बसेस अडकल्या होत्या त्यापैकी काही बसेस मंगळवारी सायंकाळी मडगावात पोहोचल्या. त्यात जॉली ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसचा समावेश होता. राधानगरी येथे पाण्याची पातळी वाढल्याने जॉली ट्रॅव्हल्सच्या तीन बसेससह आत्माराम ट्रॅव्हल्सच्या दोन, मनिष ट्रॅव्हल्सच्या दोन तर साईरुचा ट्रॅव्हल्स, लक्ष्मी ट्रॅव्हल्स व कदंबा महामंडळाची एक बस अडकली होती. राधानगरी येथे अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये दक्षिण गोव्यातील 9 शिक्षिकांसह काही महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
कोंकण रेल्वे सुरळीत पण गाड्या उशिरा
पावसामुळे मंगळवारी कोंकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणो कोलमडले होते. मात्र बुधवारी कोंकण रेल्वेची गाडी रुळावर आली. मात्र मडगावहून सुटणारी कोंकण कन्या एक्सप्रेस दुपारी 5.25 ला सुटण्या ऐवजी सायंकाळी 6.30 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी सुटली अशी माहिती कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. मंगळुरुहून मुंबईला जाणारी मंगळूर एक्सप्रेस गाडी मडगावहून सायंकाळी 4.40 च्या ऐवजी रात्री 9 वाजता निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही गाडी तब्बल साडेचार तास उशिरा धावत होती. इतरही गाडय़ा एक ते दोन तास उशिरा धावत होत्या.
दक्षिण गोव्यातील भाजी व दुध पुरवठय़ावरही परिणाम
घाटात ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे गोव्यात येणा:या दुधाच्या आणि भाजीच्याही पुरवठय़ात खंड पडला. त्यामुळे बुधवारी मडगावकरांना गावठी भाज्यावर निभावून घ्यावे लागले. कर्नाटकातून येणा:या नंदिनी आणि आरोक्य या दुधाच्याही गाडय़ा न आल्याने गोवा डेअरी व सुमूलच्या दुध पुरवठय़ावरही दुधाची मागणी वाढल्याने परिणाम झाला. त्यामुळे दक्षिण गोव्यातील कित्येक खेडेगावात दुधाची वाहने पोहोचलीच नाहीत.
खंडोबा माळी या घाऊक भाजी विक्रेत्या एजंटाने दिलेल्या माहितीप्रमाणो, दक्षिण गोव्यात दररोज भाजी घेऊन सुमारे 20 गाडय़ा येत असतात. त्यापैकी केवळ तीनच गाडय़ा बुधवारी मडगावात पोहोचल्या. चोर्ला घाटात दरड कोसळल्याने बेळगावमार्गे येणारी भाजीची वाहने अडकून पडली. त्यामुळे गोव्यातून काही लहान वाहने चोल्र्याला पाठवून मोठय़ा वाहनातील काही प्रमाणात भाजी उतरवून ती गोव्यात आणली गेली.
मडगावातील गांधी मार्केट संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, गांधी मार्केटात दररोज भाजी घेऊन तीन तर कांदे, बटाटे घेऊन एक गाडी येते. या तिन्ही गाडय़ा बुधवारी येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना मंगळवारी आणलेल्या भाजीवर निभावून न्यावे लागले. मात्र गावठी भाज्यांना त्यामुळे चांगली मागणी वाढली होती असे त्यांनी सांगितले.
राज्याबाहेरुन येणा-या दुधाच्या गाडय़ा गोव्यात पोहोचू न शकल्याने विशेषत: केपे, काणकोण, सांगे या तालुक्यातील दुध पुरवठय़ावर परिणाम झाला. नंदिनी व आरोक्याच्या गाड्या न आल्याने गोवा डेअरी व सुमूलच्या दुधाची मागणी वाढली. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती झाल्याने सावर्डे, केपे, सांगे या भागात व्यवस्थितरित्या दूध पोहोचू शकले नाही.