नवरात्र विशेष: राज्यातील पहिल्या जत्रेची मानकरी असलेली बोरीची नवदुर्गा देवी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 10:57 AM2023-10-18T10:57:05+5:302023-10-18T10:59:21+5:30

भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी श्री नवदुर्गा देवी म्हणून तिचा लौकिक आहे. 

goa navratri special bori goddess navdurga the title of the first fair in the state | नवरात्र विशेष: राज्यातील पहिल्या जत्रेची मानकरी असलेली बोरीची नवदुर्गा देवी...

नवरात्र विशेष: राज्यातील पहिल्या जत्रेची मानकरी असलेली बोरीची नवदुर्गा देवी...

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: गोव्यात नवदुर्गा देवीची देवस्थाने काही भागांमध्ये आहेत. यापैकी एक बोरीची नवदुर्गा. बोरी हा निसर्ग सौंदर्याने नटलेला गाव असून येथे ज्या प्रकारे साईबाबा देवस्थान म्हणजेच पश्चिम शिर्डी म्हणून ओळखले जाणारे साईनाथाचे मंदिर तसेच सिद्धनाथ पर्वतावर असलेल्या सिद्धनाथ देवाचे मंदिर त्याचप्रमाणे बोरी येथील नवदुर्गा देवीही तेवढीच प्रसिद्ध आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी श्री नवदुर्गा देवी म्हणून तिचा लौकिक आहे. 

नवदुर्गा देवीला गोव्यातील पहिल्या जत्रेचा मान लाभलेला आहे. पहिली जत्रा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देवीचा जत्रोत्सव होतो. यात देवीचा रथोत्सव, सुवासिनींकडून दिवजोत्सव व अन्य कार्यक्रम साजरे केले जातात. त्यानंतर राज्यातील सर्व देवस्थानांमध्ये जत्रा उत्सवाला प्रारंभ होतो. याचप्रमाणे देवीला आणखी एक जत्रेचा मान मिळाला असून तो म्हणजे रामनवमीच्या दिवशी. या दिवशी देवस्थानात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. ही देवीची दुसरी जत्रा म्हणून ओळखली जाते. यात देवस्थानात होणारा वीरभद्र पाहण्यासाठी अनेक भक्तगण उपस्थिती लावतात.

या जत्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळी देवी बोरी गावांमध्येच असलेल्या तिच्या भावाच्या घरी म्हणजे नारायण देवस्थानामध्ये त्याच्या भेटीसाठी जाते व पहाटे आपल्या घरी परतण्यासाठी निघते. यावेळी गावातील शेकडो महिला रथामध्ये बसलेल्या देवी आईला हळद कुंकू व नारळ खणाने ओटी भरून तिची पाठवणी करतात. यासाठी महिला रामनवमीपासून उपवास करतात व दुसऱ्या दिवशी ओटी भरल्यानंतर उपवास सोडतात. देवीचा नवरात्री उत्सवही तेवढाच प्रसिद्ध आहे. गावातील भक्तगण, कुळावी देवीच्या नवरात्री उत्सवात सहभागी होतात. देवीच्या मखराची विशेष पद्धतीने सजावट केली जाते व मखर विशेष प्रकारे हलविले जाते.

या नऊ दिवसांत देवी मखरामध्ये वेगवेगळ्या आसनावर विराजमान होते. यात हत्ती, सिंह, गरुड, हंस, कमळ, मोर, वाघ, गाय, अशा वाहनांवर देवी आसनस्थ होते. देवीचा मखर उत्सव सजवणे, प्रसाद तसेच अन्य सेवा करण्यासाठी देवीच्या भक्तगणांपैकी काही कुटुंबांना जबाबदारीही सोपवण्यात येते. नवरात्री उत्सव व नंतर दसरा, कौल व अवसर असेही कार्यक्रम होतात. देवस्थानामध्ये वर्षभर लालकी उत्सव, कोजागिरी, राम नवमी, जाईची पूजा, कांचोळी नवमी असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. देवीच्या जत्रोत्सवाबरोबरच नवरात्री उत्सवाला राज्याबाहेर राहत असलेले भक्तगण विशेषता दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. बोरी नवदुर्गा देवस्थानच्या समितीचे अध्यक्ष म्हणून श्याम प्रभू देसाई हे काम पाहतात.

Web Title: goa navratri special bori goddess navdurga the title of the first fair in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.