नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 09:21 AM2023-10-22T09:21:02+5:302023-10-22T09:22:25+5:30
फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: फोंडा तालुक्यात अनेक भागात आदीशक्तीची नवदुर्गा, सातेरी, शांतादुर्गा, महालसा, महालक्ष्मी या देवतांंच्या रूपात दर्शन घडवणारी अनेक देवालये आहेत. त्याचप्रमाणे महादेवाचे रूप असलेले कपिलेश्वर, नागेश, मंगेश या देवांची प्रसिद्ध मंदिरेही या महालात आहेत.
बांदोडा येथील जगप्रसिद्ध नागेश महारुद्र देवस्थान केवळ गोव्यातच नव्हे तर केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात व अन्य राज्यांमध्येही प्रसिद्ध आहे. फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
नवरात्री उत्सवात नागेश महारुद्र देव नंदी, मोर, वाघ, सिंह, गरुड अशा आसनांंवर विराजमान होतो. आठव्या दिवशी देव महारुद्र नवचंडीच्या रूपात पाहायला मिळतो. शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी रात्री देवाला ''जाणता'' म्हणजेच म्हाताऱ्या देवाचे रूप दिले जाते. देवाचे हे रूप पाहण्यासाठी अंत्रुज महालातील अनेक भक्तगण विशेष उपस्थिती लावतात.
या देवस्थानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचदिवशी रात्री मखर उत्सवाअगोदर देवाचा ‘भस्म लावण्याचा' कार्यक्रम होतो. ज्याप्रमाणे महादेवाच्या कपाळाला भस्म लावतात, त्याचप्रमाणे नागेश महारुद्र देव सुद्धा महादेवाचेच रूप असल्यामुळे त्याचे भस्म लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थिती लावतात. त्यानंतर मखरोत्सव होतो.
अन्य देवस्थानांंप्रमाणे या देवस्थानामध्येही नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी व देवीची सेवा करण्यासाठी नऊ दिवस वेगवेगळ्या कुटुंबांना जबाबदारी दिली जाते. यात गावकर कुटुंब, गावचे जोशी पुरोहित, नमशीकर, धायमोडकर, गावणेकर, खंंवटे, सरदेसाई या कुटुंबांंना तसेच कोमुनिदाद, आरकांदेकर आदी कुटुंबांनाही जबाबदारी दिली जाते.
नवरात्री उत्सवानंतर दहाव्या दिवशी रवळनाथ देवाचा अवसर होतो. त्यानंतर चार दिवस विविध कुटुंबांना कौल प्रसाद दिला जातो. देवीचे भक्तगण केवळ गोव्यात नसून कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ तसेच गुजरात या भागात विखुरलेले आहेत.
नवरात्री जत्रा उत्सवात बांदोडा येथे संस्थानच्या परिसरात राहून देवाची सेवा करतात. संस्थानाकडून देवाचा नवरात्री उत्सव व कार्तिकी पौर्णिमेला जत्रोत्सव होतो. या दिवशी देवीचे कुळावी भक्तगण महिला देवाला दिवजे पेटवतात. याशिवाय अनुष्ठान चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा होतो. दर सोमवारी संस्थानात देवाची पालखी मिरवणूक असते. देव महारुद्र संस्थानचे अध्यक्ष म्हणून दामोदर भाटकर हे सध्या काम पाहतात.