नवरात्र विशेष: मंगेशी गावची शान श्री मंगेश देव...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 07:58 AM2023-10-23T07:58:54+5:302023-10-23T08:00:13+5:30
मांगिरीश म्हणजेच मंगेश हे मूळ रूप महादेवाचे आहे.
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: अंत्रुज महालातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व निसर्गसौंदर्याची विशेष देणगी लाभलेला गाव म्हणजेच मंगेशी. या गावाची शान असलेला श्री मंगेश देवाचे मंदिर हे केवळ गोव्यातच नव्हे तर देश विदेशामध्येही तेवढेच प्रसिद्ध आहे. देवाच्या कीर्तीमुळे अनेक देश-विदेशातील व अन्य राज्यांतील भक्तगण देव दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. तसेच वर्षभर या देवस्थानात मोठ्या संख्येने पर्यटक देवस्थानचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात.
मांगिरीश म्हणजेच मंगेश हे मूळ रूप महादेवाचे आहे. या देवस्थानाबाबत अशी मान्यता आहे की अनेक वर्षांपूर्वी बाटाबाटीच्या काळात मंदिरे तोडण्यात आली होती, त्यावेळी श्री मंगेश देवाला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी देवाचे महाजन व भक्तगण कुठ्ठाळी येथून मंगेश देवाला मंगेशी येथे आणण्यात आले. श्री मंगेश देवाचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही विखुरलेले आहेत. देवाचे भक्तगण हे अन्य राज्यांमध्ये स्थायिक झालेले असले तरी देवाचा जत्रोत्सव, नवरात्री उत्सव तसेच अन्य उत्सवाला विशेष भेट देऊन देवाचा आशीर्वाद घेतात.
देवस्थानतर्फे नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नऊ दिवस मंगेश देव नंदी ,घोडा, गेंडा, सांबर, हरण, हत्ती, सिंह, वाघ या आसनावर मखरात विराजमान होताे. नवरात्री उत्सवाला मखरामध्ये बसलेले तेजस्वी व सुंदर आकर्षक रूप पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थिती लावतात. या देवस्थानामध्ये शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी मखरात बसवण्यात येणारा मंगेश हा म्हाताऱ्या रूपात दाखवला जातो. त्याचे रूप भस्म धारी बनवले जाते हे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीला नऊ दिवस वेगवेगळ्या कुटुंबांना देवाची सेवा करण्यासाठी जबाबदारी सोपवली जाते. यात प्रथम चार दिवस देशपांडे कुटुंबीय तर पाचव्या दिवशी नाडकर्णी कुटुंब सहाव्या दिवशी वर्दे बोरकर कुटुंबीय, सातव्या दिवशी कंटक कुटुंबीय, आठव्या दिवशी सलगर कुटुंबीय तर नवव्या दिवशी तेलंग कुटुंबीय यांच्याकडे सेवेचा भार सोपवला जातो.
या देवस्थानात आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्री मंगेश देवस्थानच्या मागे श्री मंगेशचे भक्त मुळकेश्वर या राखणदार याचे छोटे मंदिर आहे. अनेक लोक आपली मनोकामना, नवस या राखणदराकडे करतात व ते नवस पूर्ण झाल्यावर मुळकेश्वराला कांबळ, कोयता ,विडी याचा विशेष मान देतात. या देवस्थानामध्ये नवरात्री उत्सवाबरोबरच कार्तिकी पौर्णिमा जत्रा, राम नवमी, गोकुळाष्टमी, श्रावणातील सोमवार व अन्य उत्सव साजरे केले जातात.