नवरात्री विशेष: देश विदेशात प्रसिद्ध असलेली कवळे येथील श्री शांतादुर्गा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:32 PM2023-10-19T12:32:05+5:302023-10-19T13:02:21+5:30
दरवर्षी देश विदेशातील पर्यटक देवीच्या दर्शनाला येतात.
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : अंत्रुज महाल म्हणजेच फोंडा तालुक्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर हे गोव्यातच नव्हे तर देश विदेशातही प्रसिद्ध आहे. कवळेसारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावात असलेल्या श्री शांतादुर्गा देवीची कीर्ती देश विदेशात पसरलेली आहे. दरवर्षी देश विदेशातील पर्यटक देवीच्या दर्शनाला येतात.
श्री शांतादुर्गा देवीचा नवरात्री उत्सव जत्रोत्सवाएवढाच प्रसिद्ध आहे. नवरात्रीत फुलांनी सजवलेली सुंदर मखरात सोन्यादागिन्याने नटलेल्या देवीचे देखणे रूप पाहण्यासाठी गोवाभरातून भक्तगण उपस्थिती लावतात. देवीचे भक्तगण केवळ गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक व देश विदेशातही आहेत. मूळ केळशी येथील शांतादुर्गा कवळे येथे स्थायिक झालेली आहे. आजही देवीचा जत्रोत्सव असो किंवा अन्य कोणताही उत्सव केळशी येथील नागरिकांना विशेष मान दिला जातो.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या जत्रोत्सवाल विशेष महत्त्व असून या जत्रेला केळशी येथील नागरिक तसेच अन्य भागातील शेतकरी कणगी म्हणजेच रताळी, गावठी वांगी घेऊन येतात. यासाठीच ही जत्रा कणगांची जत्रा म्हणून गोव्यात प्रसिद्ध आहे. नवरात्री उत्सवानंतर देवीची पालखी, कौल सीमोल्लंघन व सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी पालखीत बसून गावात मिरवणूक काढली जाते. याशिवाय जत्रोत्सवाला देवीचा सांगोड व अन्य कार्यक्रमही देवस्थानतर्फे साजरे केले जातात. देवीचा वर्धापन, वैशाख पंचमी असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.