नवरात्र विशेष: भक्तांची कामनापूर्ती करणारी शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:51 AM2023-10-20T10:51:28+5:302023-10-20T10:57:20+5:30
श्री कामाक्षीचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देश-विदेशामध्येही स्थायिक आहेत.
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: फोंडा तालुक्यामध्ये देवी देवतांची मंदिरे असल्यामुळे या तालुक्याला विशेष महत्त्व लाभलेले आहे. महालक्ष्मी देवीमुळे म्हार्दोळ, मंगेश देवामुळे मंगेशी, नागेश देवामुळे नागेशी, रामनाथ देवामुळे रामनाथी, तसेच श्री कामाक्षी देवीमुळे शिरोडा गावाला विशेष महत्त्व व ओळख लाभलेली आहे. फोंडा तालुक्यातील ही मंदिरे केवळ गोव्यात नव्हे तर देश विदेशामध्येही प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेली शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी आहे. श्री कामाक्षीचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देश-विदेशामध्येही स्थायिक आहेत.
दर अमावास्येला कामाक्षी देवीच्या मंदिरात अमावास्येला भक्तगणांची सकाळ ते रात्रीपर्यंत अफाट गर्दी असते. काही वर्षांपूर्वी देवस्थानतर्फे अयुतचंडी अनुष्ठान करण्यात आले. त्यानंतर श्री कामाक्षी देवी नवसाला पावणारी म्हणून ख्यातकीर्त झाली. त्यानंतर राज्यातील विविध भागातील लोक आपले दुःख तसेच मनोकामना नवसाच्या रुपाने देवीपुढे मांडतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर पाच अमावास्या किंवा सात अमावास्यांचा नवस फेडतात. अनेक लोक अमावस्येला देवीच्या मंदिराला २१ किंवा २५ प्रदक्षिणा घालण्याचे नवसही बोलतात व त्याप्रमाणे पूर्ण करतात. दर अमावास्येला शिरोड्यात सुमारे ५० हजारच्या आसपास भक्तगण सकाळी ते रात्रीपर्यंत देवदर्शनासाठी येतात.
अमावास्याप्रमाणे देवीचा नवरात्री उत्सवही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्री उत्सवाला सजवण्यात आलेले मखर अत्यंत आकर्षक असते. सोन्या दागिन्याने नटलेली श्री कामाक्षी देवी मखरात शोभून दिसते. देवी हत्ती, घोडा, सिंह, वाघ, मोर अशा विविध आसनांवर विराजमान होते. नवरात्री उत्सवाला देवीची सेवा, सजावट तीर्थप्रसाद आदीसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कुटुंबांना जबाबदारी दिलेली आहे. देवीचे सर्व भक्तगण एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात. याशिवाय जत्रोत्सव, दसरा, कौल देवीची पालखी, पाडव्याला गुलाल उत्सव, अंबारी मिरवणूक, पंचम असे विविध कार्यक्रम देवस्थानात साजरे केली जातात.