नवरात्र विशेष: वारूळ स्वरूपातील म्हार्दोळ कुंकळ्ये येथील श्री शांतादुर्गा देवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:16 PM2023-10-21T12:16:26+5:302023-10-21T12:18:50+5:30
म्हार्दोळ कुंकळ्ये येथील शांतादुर्गा देवीचे मंदिर हे बाराव्या शतका पूर्वीपासून असल्याचे पुरातत्त्व पुरावे आहेत.
यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : म्हार्दोळ कुंकळ्ये हा गाव शहरी दूषित वातावरणापासून दूर व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आजूबाजूला असलेली पोफळीची बागायती, झरे, ओहोळ अशा निसर्ग सौंदर्याची विशेष देणगी लाभलेल्या म्हार्दोळ कुंकळ्ये या गावात श्री शांतादुर्गा देवीचे सुंदर असे मंदिर पाहायला मिळते. म्हार्दोळ कुंकळ्ये येथील शांतादुर्गा देवीचे मंदिर हे बाराव्या शतका पूर्वीपासून असल्याचे पुरातत्त्व पुरावे आहेत.
देवीची पूजा अभिषेक करण्यासाठी मूर्ती असली तरी श्री शांतादुर्गा मंदिरात गाभाऱ्यामध्ये भव्य अशा वारुळाच्या स्वरूपामध्ये असलेली श्री शांतादुर्गा देवी हीच आपली माता आहे असे भक्तगण मानतात. देवीचे भक्तगण हे गोव्यातील तसेच महाराष्ट्र आदी भागांमध्ये विखुरलेले आहेत. आजकाल देवस्थानच्या मूळ बांधकामाच्या जागी काँक्रिटचे नवे स्ट्रक्चर उभे केले जाते. मात्र म्हार्दोळ कुंकळ्ये येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर व स्ट्रक्चर आजही पूर्वीप्रमाणेच आहे. देवस्थानच्या बांधकामाला विशेष असे महत्त्व असून हेमाडपंती पद्धतीचे आकर्षक असे हे बांधकाम आहे. देवस्थानचे छप्पर शिखराचे आहे. देवस्थानाने आजही हे वेगळ्या पद्धतीचे बांधकाम टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. गोव्यात अशा प्रकारचे वेगळे स्ट्रक्चर असलेली देवस्थाने आज खूप कमी प्रमाणात आढळून येतात.
देवीचा नवरात्री उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नऊ दिवस सुंदर अशा मखरात देवी विराजमान होते. नऊ दिवस नवरात्रीला देवी केवळ वाघ व सिंह या दोनच आसनांवर विराजमान होताना पाहायला मिळते. उत्सव हा योग्य पद्धतीने करता यावा यासाठी पूर्वीपासून नवरात्री उत्सवाला नऊ दिवस विविध कुटुंबांना सेवा करण्यासाठी मान दिलेला आहे. देवीचा नवरात्र उत्सव हा सर्व भक्तगण एकत्र येऊन साजरा करतात. श्री शांतादुर्गा देवीच्या देवस्थानात जत्रा उत्सव, पालखी, राम नवमी, नवरात्री असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून व्यंकटेश शेणवी कुंकळ्येकर हे काम पाहतात.