घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर गोवा राष्ट्रवादीची बैठक

By admin | Published: May 15, 2016 07:11 PM2016-05-15T19:11:10+5:302016-05-15T19:11:10+5:30

राष्ट्रवादीतील घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश निरीक्षक नवाब मलिक सोमवारी गोव्यात दाखल होत असून पक्ष कार्यकारिणीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे

Goa NCP meeting on the backdrop of the wholesale inflation | घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर गोवा राष्ट्रवादीची बैठक

घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर गोवा राष्ट्रवादीची बैठक

Next

 पणजी : राष्ट्रवादीतील घाऊक फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश निरीक्षक नवाब मलिक सोमवारी गोव्यात दाखल होत असून पक्ष कार्यकारिणीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पक्षातील गळती रोखण्यास अपयशी ठरल्याने प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांना जबाबदार धरले जात असून अध्यक्ष पदावरून त्यांना दूर करण्याची मागणीही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक केवळ आठ ते दहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना तसेच पक्षाला खरी गरज असताना माजी अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष ट्रोजन डिमेलो यांच्यासह तब्बल ११ पदाधिकाऱ्यांनी केलेला काँग्रेस प्रवेश राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनीही गंभीरपणे घेतला आहे. या पार्श्वभूमीवरच गोवा निरीक्षक मलिक हे आज दाखल होत आहेत. पक्षात असंतोष आहे हे माहीत असतानाही तसेच स्थिती हाताबाहेर जात असतानाही प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेवण्यातच प्रदेशाध्यक्षांचे खरे कसब होते; परंतु यात ते पूर्णपणे अपयशी ठरले, अशी श्रेष्ठींचीही भावना बनलेली आहे. या उलथापालथीनंतर राष्ट्रवादी गट समित्यांचे काही पदाधिकारीही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. गट समित्यांच्या या पदाधिकाऱ्यांनी हळर्णकर तसेच ट्रोजन यांच्यामार्फत काँग्रेसशी संपर्क साधला आहे. त्यांना रोखण्यासाठी तसेच डॅमेज कंट्रोलसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत कार्यकारिणी बैठकीत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेच काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागल्याने आगामी निवडणुकीत युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचा विकास काँग्रेसच करू शकतो. त्यामुळे हाच पक्ष बळकट करण्याची गरज वाटली. त्यामुळेच काँग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, हे हळर्णकर यांचे विधान त्यादृष्टीने बरेच बोलके आहे. (प्रतिनिधी) बॉक्स - स्वार्थासाठीच पक्षबदल : देवानंद नाईक पक्षाचे उपाध्यक्ष देवानंद नाईक यांना विचारले असता, सोमवारी राज्य कार्यकारिणीची बैठक होत असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांची यात काहीच चूक नसल्याचा दावा करून जे कोणी पक्ष सोडून गेले आहेत, ते स्वार्थासाठीच गेल्याचे ते म्हणाले. हळर्णकर यांनी राष्ट्रवादीत असताना मंत्रिपद तसेच अध्यक्षपदही भोगले. ट्रोजन यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी सोडून नंतर पुन्हा पक्षात प्रवेश केला, असे ते म्हणाले.

Web Title: Goa NCP meeting on the backdrop of the wholesale inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.