राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:08 PM2023-07-21T15:08:54+5:302023-07-21T15:09:47+5:30

लोक पाणी संवर्धनाबाबत गंभीर नसल्याचा आक्षेप

goa needs three small dams and 100 dams said subhash shirodkar | राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात लोक पाण्याच्या संर्वधानाबाबत गंभीर दिसत नाही. आता जेव्हा वातावरणात बदल होत आहे, धरणे आटायला लागली, पाऊस उशीरा दाखल होत आहे अशावेळी पाणी मिळत नसल्यावर लोकांना जाग येते. राज्याला जर पुरेसे पाणी हवे असेल तर पावसाळी पाण्याच्या संर्वधनाशिवाय कुठलाच पर्याय नाही,' असे मत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकारदेखील याबाबत खूप गंभीर आहे. भविष्यासाठी काही उपाययोजना सरकारने तयार केल्या आहेत. मुख्य म्हणजे धरणातून जेव्हा पाणी कालव्यात सोडण्यात येते आणि कालव्यांमधून जेव्हा पाणी शेतासाठी पुरवले जाते. यादरम्यान पाणी खूप वाया जाते. हे पाणी वाचविले तर यातून सुमारे ३० टक्के जास्त पाणी धरणात राहू शकते. पाणी वाया जाऊ नये यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे', असे शिरोडकर यांनी सांगितले.

'गेल्या दहा वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. पर्यटन क्षेत्र वाढले, लोकसंख्या वाढली, अनेकजण शेतीकडे वळले आहेत. पाण्याचे मुख्य स्त्रोत नद्या, तळी दूषित होत आहेत. यातून पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे पाणी जर वाचवायचे असेल तर इतर काही गोष्टी नियंत्रणात येणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे,' असेही शिरोडकर यांनी सांगितले.

१०० बंधारे बांधण्याचे ध्येय 

'सध्याची पाण्याची गरज पाहता राज्यात आणखी तीन लहान धरणे आवश्यक आहेत. नद्यांवर १०० बंधारे देखील आवश्यक आहे. हे बांधण्याचे ध्येय मी ठेवले आहे. धरणांसाठी सुमारे १० ते १५ जागांची पाहणीदेखील करण्यात आली आहे. शिरोडा, काजूमळ व तातोडी ही तीन ठिकाणे जवळपास निश्चितही करण्यात आली आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले.

लोकांनी विहीरी, तळे पुनरुज्जीवीत करावीत

'लोकांनी भविष्याचा विचार करत गरजेप्रमाणे जुन्या दूषित विहीरी, तळी साफ करुन पुनरुज्जीवीत करण्यावर भर द्यावा. आमच्या राज्यात अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहे, ते टिकवले तर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

म्हादईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल

'म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, हे खरे आहे, यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आणि मला खात्री आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. खरेतर पाणी वळविणे हा एक रोगाप्रमाणेच आहे. यातून पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. एकाचे पाहून दुसरे राज्यही असेच करेल. आपल्या भागातील पाण्याचा वापर करणे यात काही वाईट नाही. परंतु पाणी वळविणे चुकीचेच,' असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.


 

Web Title: goa needs three small dams and 100 dams said subhash shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा