गोवा : नूतन पोलिस महासंचालक आलोक कुमार राज्यात दाखल
By पूजा प्रभूगावकर | Published: July 14, 2024 07:50 PM2024-07-14T19:50:12+5:302024-07-14T19:50:24+5:30
आलोक कुमार यांची विद्यमान महासंचालक जसपाल सिंग यांच्या जागी नियुक्ती झाली आहे.
पणजी : राज्याचे नवे पोलिस महासंचालक आलोक कुमार हे रविवारी येथे दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, दक्षिण गावा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
आलोक कुमार यांची विद्यमान महासंचालक जसपाल सिंग यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. आलोककुमार हे लवकरच पदाचा ताबा घेतील. तर आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले जसपाल सिंग यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकताच जारी केला आहे.
आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर खरेदीदार पूजा शर्मा हिने खासगी बाऊन्सरच्या माध्यमातून जेसीबी लावून पाडले. या प्रकरणात कारवाई करण्यापासून हणजूणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांना रोखण्यात आले. त्यांच्यावर दबाव आणण्याचा आरोप आहे. घर पडले नाही, तर अमली पदार्थांच्या खोट्या आरोपात अडकवू आणि या प्रकरणामागे असलेल्या मुंबईतील पूजा शर्मा हिच्यावर कारवाई करू यासाठी सिंग यांनी दबाव आणल्याचा जबाब निरीक्षक देसाई यांनी चौकशी अहवालात नमूद केला होता. हणजूण पोलिसांनी हा चौकशी अहवाल मुख्य सचिवांना सादर केला आहे.
पोलिस निरीक्षक देसाई यांनी महासंचालकांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सिंग यांची बदली करावी असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवले होते. या पत्रानंतर त्यांची गोव्यातून उचलबांगडी करुन त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांची महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.