गोव्याच्या पर्यटनाचे नवे पर्व; उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान ७ डिसेंबर रोजी दाखल होणार

By किशोर कुबल | Published: November 24, 2023 02:57 PM2023-11-24T14:57:49+5:302023-11-24T14:58:19+5:30

गोवा आणि उझबेकिस्तान यांच्यात पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याबाबत ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे.

goa new era of tourism uzbekistan first charter flight will arrive on december 7 | गोव्याच्या पर्यटनाचे नवे पर्व; उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान ७ डिसेंबर रोजी दाखल होणार

गोव्याच्या पर्यटनाचे नवे पर्व; उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान ७ डिसेंबर रोजी दाखल होणार

किशोर कुबल, पणजी : गोव्याच्या पर्यटनाला उझबेकिस्तानच्या पर्यटकांची बाजारपेठ मिळाली असून ७ डिसेंबर रोजी उझबेकिस्तानमधून पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल होत आहे. उभयपक्षीय पर्यटन वृद्धीच्यादृष्टीने हा एक  मैलाचा दगड ठरेल. गोवा आणि उझबेकिस्तान यांच्यात पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याबाबत ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे.

या चार्टरवर येणार्‍या पर्यटकांना त्यांच्या आगमनापासूनच गोव्याच्या आदरातिथ्य अनुभवायला मिळेल.  पहिल्या चार्टरचे आगमन ७ रोजी सकाळी ११.०५ वाजता होईल आणि येथून प्रस्थान दुपारी १२.२० वाजता होईल.   पर्यटनमंत्री रोहन खंवटे येणार्‍या पाहुण्यांना भेटून त्यांचे स्वागत करण्‍यासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहतील. राज्याच्या समृद्ध वारशाची झलक देणारा हा एक संस्मरणीय अनुभव असेल असे खंवटे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की दीर्घ आणि फलदायी सहकार्याची ही सुरुवात आहे. आम्ही उझबेकिस्तान सरकार आणि लोकांसोबत अशा प्रकारच्या आणखी करारांची अपेक्षा करतो, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आणि आपल्या राष्ट्रांमधील पर्यटन बंध मजबूत करणे, हे आमचे ध्येय आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध वाढविण्यात ही बाब महत्त्वपूर्ण ठरली आहे.'

गोव्यातील समृद्ध पर्यटन आकर्षणे दाखविण्याच्या सक्रिय प्रयत्नात गोवा पर्यटन खात्याच्या शिष्टमंडळाने नुकतेच उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यात भाग घेतला होता. उद्घाटन समारंभाला उझबेकिस्तानमधील भारताचे राजदूत  मनीष प्रभात यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उझबेकिस्तानमधील चार्टर ऑपरेटर्सनी गोव्यात विमान सेवा सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली. 

Web Title: goa new era of tourism uzbekistan first charter flight will arrive on december 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.