गोवा : १५ लाखांच्या अमली पदार्थासह नायजेरियन युवतीला अटक, शिक्षणाच्या निमित्तानं आलेली भारतात
By पूजा प्रभूगावकर | Published: May 15, 2024 03:53 PM2024-05-15T15:53:31+5:302024-05-15T15:54:30+5:30
गाेव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करण्यात तिचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
पणजी : अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) म्हापसा येथे केलेल्या कारवाईत नायजेरियन युवतीकडून १५ लाखांचा अमली पदार्थ जप्त करून तिला अटक केली. फेथ चिमेरी (२३) असे तिचे नाव असून, गाेव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करण्यात तिचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
संशयित नायजेरियन युवतीकडून १५० ग्रॅम ॲम्फेटामाईन व १०० ग्रॅम गांजा जप्त केला. सदर युवती बंगळुरूहून गोव्यात बसमधून येत होती. यावेळी तिने हा अमली पदार्थ बाळगला होता. प्राप्त माहितीच्या आधारे, मंगळवारी (१४ मे रोजी) एएनसीच्या पथकाने हॉटेल ग्रीन पार्कनजीक ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.
संशयित फेथ ही युवती भारतात २०२२ मध्ये भारतात शिक्षणाचे निमित्त करून विद्यार्थी व्हिसावर आलेली. लखनौ विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने ती भारतात आली होती. सर्वात अगोदर ती दिल्लीत राहिली. मात्र, तिने लखनौ विद्यापीठात प्रवेश घेतलाच नाही. त्यानंतर ती बंगळुरू येथे राहण्यास गेली होती अशी माहितीही त्यांनी दिली.