Goa: निहाल बेग, टोनी स्नॉक्सेल ठरले आयर्नमॅन
By समीर नाईक | Published: October 8, 2023 05:00 PM2023-10-08T17:00:58+5:302023-10-08T17:01:09+5:30
Goa News: रविवारी येथे आयोजित आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेला उत्साही प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता मिरामार येथे झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.
- समीर नाईक
पणजी - रविवारी येथे आयोजित आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेला उत्साही प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता मिरामार येथे झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. आयर्नमॅन ७०.३ चे आयोजक दीपक राज व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या रोमांचक स्पर्धेत निहाल बेग, टोनी स्नॉक्सेल यांनी आयर्नमॅन ७०.३ चा किताब पटकावला.
उद्घाटन समारंभावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानली जाणारी आयर्नमॅन ७०.३ ट्रायथालॉन स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून गोव्यात हाेत आहे, ही आमच्यासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी सहभागासाठी एक वर्ष आधीपासून याची तयारी केली जाते. त्यामुळे या ट्रायथलॉनदरम्यान सहभागींची जिद्द, चिकाटी पाहण्यासारखी असते. या स्पर्धेसाठी आमचा नेहमीच पाठिंबा असेल.’
आयोजक दीपक राज म्हणाले की, ‘राज्य सरकारचा नेहमीच आयर्नमॅन ७०.३ ला पाठिंबा लाभला आहे. त्यामुळे भविष्यात ही स्पर्धा येथेच आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. येथे सहभागींचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. आयर्नमॅनसाठी येथे चांगले वातावरण आहे.’
असा आहे निकाल :
- स्पर्धेत आंध्र प्रदेशच्या निहाल बेगनेपुरूष गटात ०४:३२:०५ अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर मणिपूरच्या एल. बितेन सिंगने ०४:३९:२४ वेळेसह दुसरे आणि बिश्वरजित सायखोम याने ०४:४२:१३ वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
- महिला गटात दक्षिण आफ्रिकेची टोनी स्नॉक्से हिने ०५:०९:१० अशी वेळ नोंदवत प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर ०५:१२:५० अशी वेळ नोंदवून झेक प्रजासत्ताकमधील तातियाना प्लायासुनोव्हा आणि कर्नाटकची टिमटीम शर्मा हिने ०५:२३:३३ अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला.
- तसेच रीलेमध्ये टीम अरायास परफॉर्मन्स इंडिया, टी. टी. बी. पियोनीर आणि टी. टी. बी. एस. वॉरियर्स यांनी अनुक्रमे पहिला ते तिसरा क्रमांक प्राप्त केला.