गोवा मानवी तस्करीचे केंद्र नव्हे: पोलीस महासंचालक जसपाल सिंग
By समीर नाईक | Published: May 10, 2024 05:47 PM2024-05-10T17:47:04+5:302024-05-10T17:48:04+5:30
गोवा पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी युनिटकडून शुक्रवारी खास जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
समीर नाईक, पणजी: गोव्याला मानवी तस्करीचे प्रमुख केंद्र असे म्हणता येणार नाही, कारण येथे अशाप्रकारच्या घटना खुप कमी घडतात. गोवा पर्यटक स्थळ असल्याने बाहेरुन येथे येऊन वैश्या व्यावसाय चालवणे एकवेळ सोपे आहे, पण येथून इतर कुठल्या ठिकाणी मानवी तस्करी होणे शक्य नाही. आम्ही मानवी तस्करी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत असतो. प्रामुख्याने भाडेकरूंच्या तपासणी वेळी चार ते पाच मुली एकत्र राहताना आढळल्यास आम्ही थेट चौकशी करतो, अशी माहीती पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली.
गोवापोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी युनिटकडून शुक्रवारी खास जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने पोलिस महासंचालक जसपाल सिंग बोलत होते. दरम्यान इतर पोलिस अधिकारी, बिगर सरकारी संस्था, समाज कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यात वैश्या व्यावसायबद्दल अनेक जाहीराती प्रसिध्द होतात. याची माहीती आम्हाला आहे. तसेच काम देण्याचे कारण देत अनेकांना या व्यावसायात आणले जाते, यावरही आमची नजर आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तक्रारी इकोनोमी ऑफेंसिव्ह सेलकडे करत असतो. हे त्यांच्या अधिपत्याखाली येते. पण गोवा पोलिसही यावर लक्ष्य ठेऊन असते. या सर्व घडमोडी असतातच पण यातून मानव तस्करी गोव्यातून होत आहे, हे म्हणणे चूकीचे आहे, असे सिंग यांनी यावेळी सांगितले.
गोवा पोेलिस हॉटेल्स, पब्स व इतर ठिकाणी कोणी भेट दिली, किती वेळा थांबले या सर्व गोष्टींचा अहवाल रोज घेतो. या व्यतिरिक्त राज्यात भाड्याच्या खोलीत कोण राहत आहे, याचाही आढावा घेत असतात. इतर अनेक उपाययोजना सुरक्षतेच्याहेतू आणि मानव तस्करी होऊ नये यासाठी केल्या जातात. आम्ही ११२ हा हेल्पलाईन क्रमांकही लोकांसाठी जारी केला आहे, असेही सिंग यांनी पुढे सांगितले.