गोवा म्हणजे दंगा करण्याची जागा नव्हे; पर्यटनमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:19 PM2018-05-30T21:19:56+5:302018-05-30T21:19:56+5:30

उघडय़ावर अनेक पर्यटक स्वयंपाक करतात. नियोजित स्मार्ट सिटीमध्ये हे चित्र ओंगळवाणे दिसते.

Goa is not a place for create ruckus | गोवा म्हणजे दंगा करण्याची जागा नव्हे; पर्यटनमंत्र्यांचा इशारा

गोवा म्हणजे दंगा करण्याची जागा नव्हे; पर्यटनमंत्र्यांचा इशारा

Next

पणजी : गोव्यात येणारे देशी पर्यटक हे विविध प्रकारे उपद्रवी ठरू लागले आहेत. यामुळे सरकारलाही काहीशी चिंता वाटू लागली आहे.
उघडय़ावर म्हणजे फुटपाथवर स्वयंपाक करणारे पर्यटक हे डोकेदुखी ठरू लागले आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्येही आता देशी पर्यटक आढळून येऊ लागल्याने त्याविषयी नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. मिरामार, दोनापावल, कांपालच्या भागात उघडय़ावर अनेक पर्यटक स्वयंपाक करतात. नियोजित स्मार्ट सिटीमध्ये हे चित्र ओंगळवाणे दिसते. उरलेले अन्न मग फुटपाथच्याच आजूबाजूला टाकून दिले जाते. स्वयंपाकाचे गॅस व भांडी फुटपाथवर ठेवून पर्यटकांच्या बसगाडीने अर्धा रस्ता अडवलाय, असेही दिसून येते. भाटलेमधील एका नगरसेवकाच्या मुलाने नुकतेच अशा एका घटनेचे व्हीडिओ रेकॉर्डीग करून पोलिसांत तक्रारही केली आहे. 

देशी पर्यटकांनी गोमंतकीयांना उपद्रव करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गेल्या आठवडय़ात सेर्नाभाटी येथे सामुहिक बलात्काराची घटना घडली. बलात्कार करणारे पर्यटक हे इंदोरचे होते. त्या पर्यटकांविरुद्ध पूर्ण गोव्यात संताप आहे. कळंगुट किनारी अकरा देशी पर्यटकांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलांची विनयभंग करण्याची व दंगाही माजवण्याची घटना बुधवारी घडली. यामुळे देशी पर्यटक गोव्यात आल्यानंतर गोव्यात काहीही केले तरी चालते, अशाच दृष्टीकोनातून पाहतात की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमधील काही मंत्रीही याबाबत चिंता व्यक्त करू लागले आहेत. यापूर्वी मंत्री विजय सरदेसाई यांनीही चिंता व्यक्त केली असून आता पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीही बेशिस्त खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.

आम्हाला पर्यटक हवेत, पण दंगामस्ती करणारे नको आहेत. मस्ती खपवून घेतली जाणार नाही. मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. गोव्याचा निसर्ग, गोव्याची मंदिरे, चर्चेस, नद्या-नाले यांचा आनंद पर्यटकांनी लुटावा. येथील सलोख्याला बाधा पोहचेल असे पर्यटकांनी काही करू नये. दारू पिऊन किंवा अन्य प्रकारे दंगामस्ती करू नये. गोमंतकीय संस्कृती व गोंयकारपण राखूनच पर्यटकांनी येथे गोमंतकीय पाहुणचाराचा आस्वाद घ्यावा. येथील फिशकरी चाखावी, गोवा म्हणजे दंगा करण्याची जागा नव्हे.
- बाबू आजगावकर, पर्यटन मंत्री         

Web Title: Goa is not a place for create ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.