गोव्यात 10 वर्षात वाहनसंख्येत 130 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 12:09 PM2018-06-26T12:09:14+5:302018-06-26T12:11:04+5:30
गोव्यात गेल्या दहा वर्षात वाहनसंख्या सुमारे 130 टक्क्यांनी वाढल्याची माहिती पुढे येत असून यामुळे रस्ते तसेच अन्य पायाभूत सुविधांवर ताण येत आहे.
पणजी : गोव्यात गेल्या दहा वर्षात वाहनसंख्या सुमारे 130 टक्क्यांनी वाढल्याची माहिती पुढे येत असून यामुळे रस्ते तसेच अन्य पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. वाहतूक खात्याकडून प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2007-08 साली खासगी आणि सार्वजनिक मिळून सुमारे 6 लाख 23 हजार 229 वाहनांची नोंद होती ती गेल्या मे महिन्यात तब्बल 14 लाख 35 हजार 287 वर पोचली. गेल्या दहा वर्षांच्या काळातच वाहनसंख्या प्रचंड वाढली आहे. दरवर्षी सुमारे 8 टक्क्यांनी वाहने वाढत असल्याचे दिसून आले आहे.
गोव्यात वाहन नोंदणीचे शुल्क तसेच रस्ता कर व अन्य कर वाढविण्यात आल्याने आता गोव्यातील काही लोक आलिशान आणि महागड्या मोटारी पाँडिचरीमध्ये नोंदणी करुन आणतात कारण तेथे कर केवळ 2 टक्के आहे तर गोव्यात तो २१ टक्के एवढा आहे. पाँडिचरी रजिस्ट्रेशनच्या अनेक मोटारी गोव्याच्या रस्त्यांवर धावताना दिसतात त्यामुळे आरटीओने आता अशा वाहनांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी यास दुजोरा दिला.
गोव्याची एकूण लोकसंख्या 15 लाख एवढी असताना तेवढ्याच संख्येने वाहनेही आहेत. प्रत्येक घरात दोन ते तीन दुचाक्या, मोटारी अशी वाहने आहेत. पावसाळ्यात अनेक जण दुचाक्या घरात ठेवून चारचाकीनेच नोकरी, धंद्यासाठी घराबाहेर पडतात त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढते आणि कोंडी होते. याशिवाय बाहेरुन येणा-या पर्यटक वाहनांचाही रस्त्यांवर ताण असतो. एका अधिकृ त माहितीनुसार राजधानी पणजी शहरातच रोज लहान-मोठी मिळून सुमारे 75 हजार वाहने प्रवेश करतात. यामुळेच तिस-या मांडवी पुलाची गरज निर्माण झाली. या पुलाचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या आॅक्टोबरमध्ये उद्घाटनाची शक्यता आहे.
वाहनवेड्या गोवेकरांना विलायती मोटारी तसेच महागड्या दुचाक्यांचाही मोठा सोस आहे. ‘लॅम्बोर्गिनी’ मर्सिडिझ बेंझ, फेर्रारी, बीएमडब्ल्यु, हॉक्सवेगन यासारख्या चारचाकी, यामाहा मॅक्स-1200 सारख्या दुचाक्याही दिसतात.